Advertisement

संपादकीय अग्रलेख- जरांगेंना काटशह ?

प्रजापत्र | Monday, 24/02/2025
बातमी शेअर करा

कोणतेही आंदोलन दीर्घकाळ चालणार असेल तर ते एकसंघ राखणे अवघड असते, त्यातही समोरचे सरकार भाजपचे असेल तर ते अधिकच अवघड असते याचा प्रत्यय आता (Manoj Jarange) मनोज जरांगे यांना यायला हरकत नाही. (Maratha Reservation) मराठा आरक्षणाच्या विषयात मागच्या दोन दशकात  अनेकांनी योगदान दिले, मात्र मागच्या दोन वर्षात मराठा आरक्षण म्हणजे मनोज जरांगे असे जे चित्र निर्माण झाले आहे, त्याला छेद देण्याची सुरुवात आता अधिक जोरकसपणे होत आहे. (Kolhapur) कोल्हापूरमध्ये मराठा समाजाच्या अनेक संघटना बैठक घेतात आणि वेगळ्या आंदोलनाचा एल्गार पुकारतात हा मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना एकप्रकारचा काटशह तर नाही ना ?

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचे आंदोलन आजचे नाही. अगदी अण्णासाहेब पाटील, पंजाबराव देशमुख आदींनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे बीजारोपण केलेले होते. नंतरच्या काळात अनेकांनी आपापल्या पातळ्यांवर आणि आपापल्या मार्गाने मराठा आरक्षण आंदोलन तेवते ठेवले. दिवंगत विनायक मेटे यांनी हा प्रश्न सातत्याने लावून धरला होता. महाराष्ट्रातील सरकारांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचे जे प्रयत्न केले त्यामागे दिवंगत विनायक मेटे यांचे योगदान महत्वाचे होते. अगदी दिवंगत (Gopinath Munde)गोपीनाथ मुंडे यांनी देखील मराठा सेवा संघाच्या कार्यक्रमातून मराठा आरक्षणासाठी पोषक भूमिका घेण्याचे जाहीर केले होते. मराठा क्रांती मोर्चा , मराठा क्रांती ठोक मोर्चा, छावा सारख्या संघटना आदी अनेकांचे मराठा आरक्षणासाठी प्रयत्न होते आणि अजूनही आहेत. मराठा समाजातील काही जाणकारांनी न्यायालयीन प्रक्रियेच्या माध्यमातून आरक्षणाचा लढा उभारला. या साऱ्यांची आठवण यासाठी करायची की महाराष्ट्रात अगदी मागच्या दोन वर्षापर्यंत , म्हणजे २०२३ च्या मध्यापर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचे आंदोलन हे अनेक व्यक्तींभोवती फिरत होते. नंतरच्या काळात मात्र मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनात मनोज जरांगे यांची एन्ट्री झाली, त्यांच्या अराजकीय चेहऱ्यामुळे असेल किंवा राजकीय भूमिका घेणाऱ्या व्यक्ती आणि संघटनांकडून काहीसा भ्रमनिरास झाल्यामुळे असेल, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेतृत्व मनोज जरांगे यांच्याकडे आले. त्यात त्यावेळच्या शिंदे सरकारच्या भूमिका देखील (Manoj Jarange) मनोज जरांगे त्यांच्यादृष्टीने पोषक ठरल्या.
आतापर्यंतचे आरक्षण शाश्वत नाही असेच अनुभव होते. राज्य मागासवर्ग आयोगाचे अहवाल देखील सर्वोच्च न्यायालयात टिकत नाहीत असे अनुभव गाठीस असलेल्या मराठा समाजाला म्हणूनच मग मनोज जरांगे यांच्या 'घेवूत तर असेच ' पासून 'कसे देणार नाहीत , घेतच असतोत ' 'अन मग मराठे कुठेही घुसतेल ' 'तुम्हाला काय आमच्या लेकराबाळांच वाटोळं करायचंय का ?' 'मी आमच्या लेकराबाळांसाठी बोलतोय ' असल्या धाटणीचे आंदोलन अधिक भावले. सरकारने देखील न्या. शिंदे समितीच्या माध्यमातून लगेच कुणबी आणि मराठा नातेसंबंध शोधण्यासाठी समिती नेमली,राज्यात अनेकांना कुणबी प्रमाणपत्रे मिळू लागली. (Manoj Jarange)मनोज जरांगे समाजचे हिरो झाले, दैवत झाले . हा झाला आतापर्यंतचा इतिहास , पण पुढे काय ?
आज मराठा समाजाला जी कुणबी प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत आणि त्या माध्यमातून जे ओबीसी आरक्षण दिले जात आहे ते भविष्यात खरोखर किती टिकेल यावर वेगवेगळे मतप्रवाह आहेत. आजच्या वातावरणात असे काही बोलणे बहुसंख्यकांना आवडणारे नसले तरी पुढे काय वाढून ठेवलेले आहे याचा मराठा समाजातील अनेकांना अंदाज आहे. मनोज जरांगे यांची सगेसोयरे ची मागणी पूर्ण करणे संवैधानिक दृष्ट्या अवघड आहे. मुंबईच्या सीमेवर सगेसोयरे चा केवळ 'मसुदा ' हाती देऊन सरकारने मनोज जरांगे यांची कशी बोळवण केली आणि त्या मसुद्यालाच जणू काही आता कायदा झाला असे समजून गावागावात गुलालाची उधळण कशी करण्यात आली, नंतरच्या काळात समाजाला स्वतःची फसगत कशी लक्षात आली या अनेक गोष्टी आरक्षण आंदोलनात आहेत. हे सारे होत असताना मराठा आरक्षण आंदोलनाच्या माध्यमातून मनोज जरांगे यांची निर्माण झालेली प्रतिमा सरकार , मराठा समाजातील बहुतांश नेते, पुढारी आणि अनेकांसाठी अडचणीची झालेली आहे हे देखील वास्तव आहे. त्यामुळेच या आंदोलनात पर्यायी नेतृत्व किंवा बहुमुखी नेतृत्व कसे निर्माण करता येईल यासाठी सरकारसह अनेकजण प्रयत्नशील आहेतच. त्यातच (Manoj Jarange)मनोज जरांगे यांचे 'मी इतर कोणाला जवळ करीत नसतो, माझ्या स्टेजवर कोणाला उभा करीत नसतो ' हे जे काही धोरण आहे , ते त्यांचे आंदोलन हायजॅक केले जाऊ नये म्हणून ठीक असेल कदाचित, पण असे आंदोलन दीर्घकाळ चालविणे अवघड असते. त्यातच विधानसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे यांनी घेतलेली भूमिका मराठा समाजातील अनेक नेत्यांना तोंडघशी पडणारी होती, त्यामुळे आता त्या अनेक नेत्यांचे कार्यकर्ते मनोज जरांगे यांच्यापासून दुरावले आहेत. आजही (Maratha)मराठा समाजातील फारशा राजकीय महत्वकांक्षा नसलेला सामान्य माणूस , किंबहुना राजकीयदृष्ट्या भाबडा म्हणावा असा तरुण मनोज जरांगे (Manoj Jarange)यांच्यासोबत आहे. मात्र केवळ अशा समूहाच्या जोरावर , राज्यातील लोकसंख्येने सर्वात मोठ्या असलेल्या समाजाचे आंदोलन पुढे नेता येत नसते, हे कटू वास्तव मनोज जरांगे यांनी देखील लक्षात घेणे आवश्यक आहे.
त्यामुळेच आता कोल्हापूरमध्ये मराठा समाजाच्या काही संघटनांचे पदाधिकारी मराठा आरक्षण परिषद म्हणून बैठक घेणार असतील आणि (Manoj Jarange)मनोज जरांगे यांनी केलेलीच मागण्या पुढे रेटणार असतील, त्यासाठी सरकारला वेळ मागणार असतील तर हा त्या संघटनांचा अधिकार आहे, मात्र त्यासोबतच मनोज जरांगे यांना काटशह देण्याची सुरुवात आहे असे समजायला हरकत नाही.

Advertisement

Advertisement