बीड दि. १७ (प्रतिनिधी ) : एकीकडे शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देण्याची घोषणा राज्य शासनाने केलेली असतानाच आता २०२४ च्या पीक विमा नुकसानभरपाईबाबत कंपनीने नवीनच माहिती समोर आणली आहे. शासनाने अद्याप विम्याच्या प्रिमिअमचा हप्ताच कंपनीला दिला नसल्याने शेतकऱ्यांना विमा नुकसान भरपाई देता येणार नसल्याची भूमिका विमा कंपनीने घेतली आहे. शासनाकडून प्रिमिअम येताच ३० दिवसात नुकसान भरपाईचे दावे निकाली काढले जातील असे पीक विमा कंपनीने म्हटले आहे.
बीड जिल्ह्यासह राज्यभरात पीक विमा नुकसान भरपाई हा कळीचा मुद्दा बनला आहे. बीड जिल्ह्यात २०२२-२३ ची नुकसान भरपाई अद्याप मिळालेली नाही . तसेच २०२४ च्या खरीप हंगामाची पीक विमा नुकसान भरपाई देखील मिळालेली नाही. २०२४ मध्ये सरकारने एक रुपयात पीक विमा अशी घोषणा केली होती. त्यानुसार शेतकऱ्याने विमा कंपनीकडे केवळ १ रुपया भरायचा,त्याच्या ठरलेल्या प्रीमियमची रक्कम शासन विमा कंपनीला देणार अशी ती योजना होती. त्यानुसार बीड जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांनी विमा उतरविला, मात्र त्यांना २०२४ ची नुकसान भरपाई मिळालेली नाही. यासंदर्भाने आता भारतीय कृषी विमा कंपनीने वेगळीच खळबळ उडवून दिली आहे. २०२४ च्या खरीप हंगामातील प्रिमिअम अनुदानाचा पहिला हप्ता शासनाने अद्याप विमा कंपनीला दिला नसल्याचे कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे प्रिमिअमचा पहिला हप्ता मिळाल्यानंतर ३० दिवसाच्या आता काढणीपूर्व नुकसानीचे दावे निकाली काढले जातील तर दुसरा हप्ता मिळाल्यावर काढणी पश्चात नुकसानीचे दावे निकाली काढले जातील असे भारतीय कृषी विमा कंपनीने कळविले आहे. त्यामुळे शासनाच्या एक रुपयात पीक विमा योजनेच्या हेतूलाच हरताळ फसला गेला आहे. खरीप हंगाम संपूनही शासनाने अद्याप २०२४ च्या हंगामाचा प्रिमिअम का भरला नाही हे मात्र कोडे आहे.
किसान सभेकडून पाठपुरावा
बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित पीक विम्याचा प्रश्न किसान सभेच्या माध्यमातून सातत्याने लावून धरला जात आहे. याच विषयावर किसान सभेने सातत्याने आंदोलने देखील केली आहेत. सोमवारी देखील प्रलंबित पिकविम्यासाठी किसान सभेच्या वतीने भारतीय कृषी विमा कंपनीच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांनी दिवसभर ठिय्या दिल्यानंतर २०२४ च्या पीक विम्यासंदर्भाने सरकारी उदासीनतेचा नवाच मुद्दा समोर आला आहे.
आ. धस यांनी घेतली आंदोलकांची भेट
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी किसान सभेच्या माध्यमातून येथील पीक विमा कंपनीच्या कार्यालयाबाहेर दिवसभर आंदोलन केले. शेकडो शेतकरी रणरणत्या उन्हात आंदोलन करीत असल्याचे माहित झाल्यानंतर आ. सुरेश धस यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा केली.
२३-२४ चे दावे फेब्रुवारी अखेरीस निकाली
या आंदोलनानंतर विमा कंपनीने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे २३-२४ चे भरपाई दावे २८ फेब्रुवारीपर्यंत निकाली काढले जातील असे स्पष्ट आश्वान लेखी दिले आहे.