बीड दि. १५ (प्रतिनिधी ) : बीड जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी भोवती सुरु असलेले वेगवेगळ्या वादांचे वादळ शमायला तयार नाही. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या संदर्भाने काही आरोप झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी आपल्या पक्षाची बीड जिल्ह्यातील सर्व कार्यकारिणी बरखास्त केली , मात्र त्याचवेळी वाल्मिक कराड यांच्याशी असलेल्या संबंधांमधून ज्यांची सीआयडीने चौकशी केली, ते राजेश्वर चव्हाण मात्र जिल्हाध्यक्षपदावर कायम आहेत. मग अजित पवारांच्या राष्ट्रवादीत एका एक आणि दुसऱ्याला वेगळा न्याय का असा प्रश्न कार्यकर्तेच दबक्या आवाजात विचारत आहेत.
बीड जिल्ह्यात संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर गेली. या हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी असलेला विष्णू चाटे हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी असल्याने नंतरच्या काळात अजित पवारांनी बीड जिल्ह्यातील सारी कार्यकारिणीचे बरखास्त केली. याचा परिणाम म्हणून ज्यांनी निष्ठेने पक्षाचे काम केले होते आणि कोणत्याच प्रकरणाशी ज्यांचा कसलाच संबंध नव्हता अशा अनेक प्रामाणिक कार्यकर्त्यांची देखील पदे गेली. ही कार्यकारिणी बरखास्त करताना लवकरच नवीन कार्यकारिणी जाहीर करण्याची घोषणा देखील केली गेली होती, मात्र ती हवेत विरली आहे. विशेष म्हणजे सारी कार्यकारिणी बरखास्त झाल्यानंतर सध्या केवळ राजेश्वर चव्हाण हे जिल्हाध्यक्षपदावर कार्यरत आहेत. मग ज्या लोकांचा कोणत्याच प्रकरणाशी काहीच संबंध नव्हता त्यांची पदे काढून घेतली गेली आणि ज्यांची खंडणीच्या वादग्रस्त प्रकरणाच्या संदर्भाने सीआयईडने चौकशी केली, ते मात्र पदावर कायम आहेत, यामागचे गौडबंगाल कार्यकर्त्यांना समजायला तयार नाही. अजित पवारांची कार्यपद्धती सर्वांना सारखा न्याय देणारी आहे, इथे मात्र एकाला एक आणि दुसऱ्याला वेगळा न्याय कशासाठी ? पक्षाचे जिल्हाध्यक्ष बदलणार आहेत का कार्यकारिणी नव्याने निवडली जाणार आहे ? पक्षाचे नेमके धोरण तरी काय आहे अशा अनेक चर्चा सध्या दबक्या आवाजात अजित पवारांच्या राष्ट्रवादीत होत आहेत .
![](https://prajapatra.com/sites/default/files/styles/large/public/IMG-20250216-WA0004.jpg?itok=-qhFe3n8)
प्रजापत्र | Sunday, 16/02/2025
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा