बीड दि. १५ (प्रतिनिधी)-:संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बीडचे पालकमंत्रिपद थेट अजित पवारांकडे(Ajit Pawar) गेले.त्यातच बीड जिल्ह्यात नियोजन समितीच्या माध्यमातून देण्यात आलेल्या कामांची देखील चौकशी लावण्यात आली,यामुळे जिल्ह्यातील कार्यकर्ते,कंत्राटदार हवालदिल झाले असतानाच आता बीड जिल्ह्यात कामे करण्यासाठी थेट पुण्यातील मंडळी (Contractor in Pune)गुडघ्याला बाशिंग लावून बसली असल्याचे चित्र आहे.अनेक एजन्सींनी बीडमध्ये गाठीभेटी वाढविल्या असून 'तुमच्या जिल्ह्यात आपण काम करू' अशी गळ ते स्थानिक प्रभावी व्यक्तींना घालत असल्याचे चित्र आहे.
मागच्या काही काळात बीड जिल्ह्यात राजकीय कार्यकर्त्यांसाठी उन्हाळा सुरु असल्याचे चित्र आहे.दोन महिन्यापेक्षा अधिक काळापासून संतोष देशमुख हत्या प्रकरणाचीच चर्चा जिल्ह्यात असून इतर सर्व विकासकामे(Public works) ठप्प झाल्याचे चित्र आहे.त्यातच बीडचे पालकमंत्रिपद थेट अजित पवारांकडे गेले.अगोदरच अजित पवारांच्या नावाचा दरारा खूप आणि त्यात बीडच्या राजकीय कार्यकर्ते असलेल्या कंत्राटदारांची बोगस कामे करतात म्हणून बदनामी झालेली.हे कमी का काय म्हणून,मागच्या नियोजन समिती (DPC)बैठकीनंतर थेट अजित पवारांनीच बीड जिल्ह्यातील नियोजन समितीच्या माध्यमातून झालेल्या कामांची चौकशी लावली. त्यामुळे मोठ्या-प्रमाणावर कार्यकर्ते हवालदिल झाले आहेत.एकतर आता कामे मिळविण्यासाठी थेट अजित पवारांशी संपर्क साधायचा कसा हा प्रश्न कार्यकर्त्यांना पडलेला आहे.अजित पवारांची कार्यपद्धती पाहता ते जिल्ह्यातील कोणत्याही एका व्यक्तीला सर्वाधिकार देतील अशीही परिस्थिती नाही,त्यामुळे आता कामे मिळवायची कशी हा प्रश्न अनेकांसमोर आहेच.
हे कमी का काय म्हणून आता बीड जिल्ह्यात कामे करण्यासाठी पुण्यामधील कंत्राटदारांची लॉबी(Contractor lobby) गुडघ्याला बाशिंग बांधून बसली असल्याची माहिती समोर येत आहे.पुण्यातील अनेक एजन्सी बीडच्या नियोजन विभागात देखील घिरट्या घालताना दिसत आहेत.बीडमधील कंत्राटदारांची अगोदरच बदनामी करण्यात आलेली आहेच,त्यामुळे आता पुण्यातील कंत्राटदारांच्या लॉबीला बीड जिल्ह्यात रस वाटत आहे.काही स्थानिक लोकांना हाताशी धरून का होईना पण बीड जिल्ह्यात कामे मिळविण्यासाठी या लॉबीने हात पाय हलविणे सुरु केले आहे.
तुकडे पाडण्याच्या पद्धतीला लागणार ब्रेक
बीड जिल्ह्यात ई-निविदा आणि इतर नियमांमधून सुटका करून घेण्यासाठी कामाचे तुकडे पाडून ती कामे वेगवेगळ्या कार्यकर्त्यांमध्ये विभागून देण्याची पद्धत आहे.अजित पवारांच्या पुण्याची कार्यपद्धती मात्र वेगळी आहे.तेथे एकाच प्रकारची कामे असतील असतील ती क्लब करायची आणि कोणत्यातरी मोठ्या एजन्सीला द्यायची असे प्रकार चालतात असे सांगितले जाते.त्यामुळे आता तोच पायंडा बीड जिल्ह्यात देखील राबविला जाईल अशी चर्चा आहे.