Advertisement

दमानियांच्या 'पुतणा मावशी' प्रेमाने जिल्ह्याच्या प्रतिमेचा बळी

प्रजापत्र | Tuesday, 28/01/2025
बातमी शेअर करा

बीड दि. २७( प्रतिनिधी) : एकदा का प्रसिध्दीची आणि सनसनाटीची हाव निर्माण झाली की मग व्यक्तीचा विवेक हरवतो, तसे सध्या अंजली दमानियांच्या बाबतीत झाले असावे असे चित्र आहे. कोणीतरी काहितरी माहिती द्यायची आणि आपण खुप मोठा शोध लावल्याच्या अविर्भावात अंजली दमानियांनी त्याला सनसनाटीचे स्वरुप द्यायचे असे उद्योग सध्या सुरु आहेत.आपल्या या पुतणा मावशी प्रेमातून  त्या बीडच्या प्रतिमेचा बळी देत  चालल्या आहेत याचेही भान त्यांना राहिलेले नाही. बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्यावर दमानियांनी केलेले आरोप असेच बुड ना शेंडा धाटणीचे असल्याने दमानियांच्या एकुणच भूमिकेबद्दल संशय निर्माण झाला आहे. 

 

अंजली दमानिया या स्वतःला सामाजिक कार्यकर्त्या म्हणवतात, पण त्यांची राज्याला खरी ओळख आहे ती सनसनाटी आरोप करणारी व्यक्ती म्हणूनच. दहा बारा वर्षापुर्वी त्यांनी असेच बीड जिल्ह्यात सनसनाटी आरोप केले होते आणि पत्रकार परिषदेतून निरुत्तर होऊन गेल्या होत्या. आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांनी पुन्हा बीड जिल्ह्याला बदनाम करण्याचा विडा उचलला आहे. 
दमानियांच्या आरोपांना तितकाच मोठा वास्तवाचा आधार असता तरी ते समजण्यासारखे होते. मात्र कोणीतरी त्यांना एसएमएस करुन काहितरी माहिती देतो आणि त्याची खातरजमा न करता या माध्यमांसमोर येऊन सनसनाटी निर्माण करतात. मागे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी मारले गेले आहेत असा सनसनाटी शोध यांनीच लावला होता. प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या जाती काढण्याचे समाजकार्य देखील यांचेच. आता त्या पुन्हा चर्चेत येऊ पाहत आहेत ते जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्यावरील आरोपांनी. 
बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक असलेल्या डॉ. अशोक थोरात यांचे जिल्हयासाठीचे योगदान सर्वांना माहित आहे. कोरोना काळात डॉ. अशोक थोरात यांनी जिल्हयात केलेली सेवा जिल्हयाला माहित आहे, त्यामुळे दमानियांसारख्या अर्धवट माहितीवर बोलणारांमुळे डॉ. थोरात बदनाम होत नाहीत पण जिल्हयाच्या प्रतिमेला नक्कीच तडे बसतात. 
डॉ. अशोक थोरात यांच्या संबंधाने ज्या हॉटेलचा उल्लेख झाला त्यावर थोरात बोलतील कदाचित, पण जो व्यक्ती शासनाची पूर्वपरवानगी घेऊन विदेशात जातो त्याच्यावर बेछूट आरोप करायचे हे कुठले समाजकार्य? संतोष देशमुख यांचे शवविच्छेदन डॉ. अशोक थोरात यांनी केले नव्हते, आणि त्या शवविच्छेदन अहवालावर आतापर्यंत तरी कोणी संशय घेतला नव्हता, मग आताच दमानिया कशासाठी संशयाची भुते नाचवित आहेत? वाल्मिक कराडांना आयसीयुत ठेवल्याचा एखाद्यावर ठपका ठेवताना ती व्यक्ती रजेवर आहे इतकी जुजबी माहिती घेण्याची गरज अंजली दमानियांना वाटत नसेल तर मग त्यांच्या भूमिकेबद्दल सामान्यांना संशय येणारच. 
अंजली दमानियांना बीडचा फार पुळका आहे, प्रेम आहे असे कधी दिसलेच नाही. असलेच तरी ते 'पुतणा मावशी' स्टाईलचे असू शकते. या आरोपांमधून या आधुनिक पुतणा मावशींना बीडच्या प्रतिमेची हत्या करायची आहे का? का मनोज जरांगेंच्या आंदोलनावरुन लक्ष हटविण्यासाठी त्या असले काही सनसनाटी आरोप करीत आहेत आणि त्यात डॉ. अशोक थोरातांसारख्या तळमळीच्या अधिकाऱ्यांचा त्यांना बळी द्यायचा आहे का? दमानियांच्या या उठाठेवीचा  हेतू तरी काय?

Advertisement

Advertisement