Advertisement

 बीड दि.3 (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवरून राज्यभरात रान उठल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी वाळूमाफीयांसह सर्वांचाच बंदोबस्त करण्यासाठी पोलीस अधिक्षकांची बदली केली. बीडला नवीन पोलीस अधिक्षक येताच त्यांनी अवैध धंद्यांवर अंकुश लावायला सुरूवात केली असून वाळू तस्करांना बडगा दाखविला. त्यानंतर केवळ वाळू तस्करीवर चालणारे दोनशेहून अधिक हायवा आता वेगळे काम शोधू लागले आहेत. काहींनी रेल्वेच्या कामासाठी तर काहींनी पवनचक्क्यांवर कामासाठी शोधाशोध सुरू केली आहे. प्रशासनाने मनात आणल्यावर कोणतीच गोष्ट रोखणे अवघड नाही हेच यातून दिसत आहे. 

 

बीड जिल्ह्यात गुटखा, मटका, वाळू अशा वेगवेगळ्या प्रकारची माफीयागिरी सुरू असल्याचे स्वत: मुख्यमंत्र्यांनी थेट विधानसभेतून राज्याला सांगितले होते. बीड जिलह्यात वाळू तस्करीत मोठी उलाढाल होते. एकट्या गोदापात्रात दोनशेपेक्षा अधिक हायवा केवळ वाळू तस्करीसाठी चालत होत्या. अनेकांनी कर्ज काढून हायवा घेतल्या. एक महिना हायवा रात्रंदिवस वाळूसाठी चालली तर गाडी नील होते या भावनेतून अनेक हौसे नवसे या धंद्यात उतरले. अनेकांना हा धंदा म्हणजे रात्रीतून श्रीमंत होण्याचा धंदा वाटला. आता मात्र पोलीसांनी वाळू तस्करांना बडगा दाखवायला सुरूवात केली आहे. परिणामी गोदापात्रातून होणारी वाळू तस्करी बर्‍यापैकी कमी झाली आहे. पोलीस अधिक्षकांनी काही पोलीस कर्मचार्‍यांनाही बडगा दाखविल्याने आता सगळेच धास्तावले आहेत. याचा परिणाम म्हणून वाळू तस्करीसाठी आतापर्यंत वापरल्या जाणार्‍या हायवा चालकांनी वेगळा धंदा शोधणे सुरू केले आहे. विशेष म्हणजे या धंद्यात मुरलेल्या काहींनी वार्‍याची दिशा ओळखून आपले हायवा नव्याने धंदा देणार्‍याच्या गळ्यात मारले आणि ते मोकळे झाले. आता जर इतर ठिकाणी काम मिळाले नाही तर बँकवाले किंवा फायनान्सवाले गाड्या ओढून नेतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळे कोणी रेल्वेच्या कामाला तर कोणी पवनचक्क्यांच्या कामाला हायवा लावण्यासाठी लग्गा लावता येतो का या शोधात आहेत. 

 

 

पंधरा दिवसात राखेचा एकही हायवा परळीबाहेर पडला नाही
परळीच्या थर्मलमधून राखेची वाहतूक करण्याची एक वेगळीच अर्थव्यवस्था सध्या जिल्ह्यात आहे. मात्र मागच्या काही दिवसात या राख वाहतूकीलाही चाप बसला आहे. राखेची अवैध तस्करी करणारे पोलीसांच्या रडारवर असल्याने मागच्या पंधरा दिवसात राखेने भरलेला एकही हायवा परळीबाहेर पडला नसल्याचे लोक सांगतात. त्यामुळे आता थर्मल परिसरात मोठ्या प्रमाणावर राख साचल्याचे चित्र आहे.

 

Advertisement

Advertisement