रिकामटेकडे लोक पारावर बसून अजबगजब गप्पा मारीत असतात त्याला चकाट्या पिटणे असे म्हणत असतात. खरेतर अशा चकाट्यांना फारसे कोणी गांभीर्याने घेत नाही पण स्वतःला अगदी कर्तव्यदक्ष किंवा समाजासाठी दिशादर्शक म्हणून मिरविणार्या लोकांनी जर अशा चकाट्या पिटल्यासारख्या गप्पा सुरू केल्या आणि त्यामुळे समाजातील द्वेष वाढणार असेल तर अशा लोकांना वेळीच आवरणे देखील गरजेचे असते. अंजली दमानियांच्या बाबतीत सध्या हिच परिस्थिती निर्माण झाली आहे.
अंजली दमानिया या तशा राज्यातल्या स्वतःनेच स्वतःला मोठे ठरविलेल्या आणि आपल्या भोवती मोठेपणाचा कोष विणलेल्या नेत्या आहेत. त्यांच्या भोवती कार्यकर्त्यांचे मोहळ किती आहे किंवा त्यांना जनमानसात किती पाठींबा आहे हे अजून तरी कोणी पडताळलेले नाही पण तरीही दमानिया अधूनमधून वेगवेगळ्या विषयांवर स्वतःची मते मांडत असतात. कधी कुठेतरी याचिका दाखल करीत असतात. कोणावर ना कोणावर आरोपाच्या दुगाण्या झाडीत असतात. याला दुगाण्या यासाठी म्हणायचे की त्यांनी केेलेले एखादे आरोप न्यायालयीन प्रक्रियेत शेवटपर्यंत टीकले असे अजूनतरी सिद्ध झालेले नाही.
या अंजली दमानियांना मुंबई खालोखाल जर कोणता भाग प्रिय असेल तर तो म्हणजे बीड जिल्हा. त्या राज्याच्या नागरिक आहेत त्यामुळे त्यांना बीडबद्दल बोलण्याचा अधिकार आहे मान्य. पण अधिकार आहे म्हणून आपण एखाद्या जिल्ह्याची किती बदनामी करावी याची कोणतीच मर्यादा अंजली दमानियांनी ठेवलेली नाही. संतोष देशमुख हत्या प्रकरण संपूर्ण राज्यात चर्चेत असताना आणि त्यामुळे राज्यभरातील यंत्रणा कामाला लागलेल्या असताना या दमानिया मॅडम सनसनाटी वृत्त देण्यासाठी म्हणून कर्नाटक सिमेवर सापडलेल्या कोणत्या तरी तीन मृतदेहांचा थेट या हत्याकांडाशी संबंध जोडून मोकळ्या होतात. त्यांना ही माहिती देणारा स्त्रोत कोण? आणि त्याची विश्वासार्हता किती हे देखील पाहण्याची आवश्यकता दमानियांना वाटत नाही. यातच त्यांचे सामाजिक भान लक्षात येवू शकते. हे कमी की काय म्हणून अगोदरच जातीय विद्वेषानहोरपळणार्या बीड जिल्ह्यात अमुक एका जातीचे अधिकारी प्रमाणापेक्षा जास्त आहेत असले काही सांगून दमानिया मोकळ्या झाल्या. ही उदाहरणे सांगताना यातील अनेक अधिकार्यांची जिल्ह्यातून बदली झाली आहे हे देखील त्यांच्या गावी नसावी किंवा त्यांना ते जाणिवपूर्वक लपवायचे असावे. हे सारे करून अंजली दमानियांना नेमके काय साधायचे आहे? हे त्यांचे त्याच जाणोत पण त्यांच्या अशा वक्तव्यांनी अगोदरच जातीयतेच्या मुद्यावर संवेदनशिल झालेल्या बीड जिल्ह्यातील सामाजिक सलोखा अधिकच बिघडत असेल तर जिल्ह्याच्या नागरीकांना आणि जिल्ह्याच्या प्रशासनालाही याचा विचार करणे क्रमप्राप्त आहे.
अंजली दमानियांचे बीडला बदनाम करण्याबाबतचे हे प्रेम काही पहिल्यांदाच उफाळून आलेले नाही. यापूर्वी म्हणजे 12-15 वर्षापूर्वी देखील काही प्रकरणात अंजली दमानियांनी बीडमध्ये येवून असेच बेछूट आरोप केले होते.
अंजली दमानिया काय किंवा आणखी कोणी काय, जर काही चुकीचे होत असेल तर ‘व्हिसल ब्लोअर’ म्हणून भूमिका बजावण्याचा अधिकार निश्चितपणे प्रत्येकाला आहे पण हे करताना आपली वक्तव्य केवळ एकांगी होवू नयेत आणि कुठलाही बुडखा, शेंडा नसलेल्या माहितीवर आधारीत असू नयेत इतकी तरी खबरदारी घेतली गेली पाहीजे असे झाले तर मंग संबंधितांच्या हेतूवर संशय येत नाही. दमानियांना हा संकेत कधी पाळताच आला नाही.