समीर लव्हारे
बीड दि. २१: बीडचे पोलीस (beed police)अधिक्षक म्हणून अविनाश बारगळ यांनी चार महिन्यात मल्टीस्टेटमधील आरोपी,अवैध दारू,हवाला रॅकेट,ड्रंक अँड ड्राईव्ह,पत्याचे क्लब,माफियांची दादागिरी,निवडणूक काळातील मोठी रोकड जप्त करण्याचे काम केले.तसं चार महिन्यात साऱ्या राज्याला हादरवणारे मस्साजोग हत्याकांड,बीडमधील गोळीबाराची मोठी घटना सोडली तर अविनाश बारगळ यांच्या कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करावे अशी परिस्थिती निर्माण झाली नव्हती.मात्र काही घटनांमध्ये व्यवस्थेचा 'होयबा' झाल्याने अविनाश बारगळसारख्या चांगल्या अधिकाऱ्याची जिल्ह्यातून उचलबांगडी झाली असं म्हणायला आता हरकत नाही.बारगळ यांच्यापूर्वी पोलीस अधिक्षक म्हणून काम केलेले नंदकुमार ठाकूर यांच्या कार्यकाळात तर अनेक गंभीर घटना घडल्या.बीड जिल्ह्यात झालेला हिंसाचार गंभीर स्वरूपाचा होता.इतिहासात काळ्या अक्षराने नोंद होईल अशी ती घटना घडली होती.मात्र त्यावेळी सभागृहात नंदकुमार ठाकूर यांच्या पाठिशी हेच सरकार उभे राहिले आणि येथे मात्र बारगळ यांचा बळी गेल्यामुळे आता जिल्ह्यात अनेक चर्चांना ऊत आला आहे.
बीड (beed)जिल्ह्याची ओळख अलीकडच्या काळात गुन्हेगार आणि दादागिरी करणाऱ्यांचा जिल्हा अशी होत आहे.बीडच्या नागरिकांना बाहेर जिल्ह्यात गेल्यानंतर त्यांच्याकडे इतरांचा पाहण्याचा दृष्टिकोनही वेगळा स्वरूपाचा असतो,इतकी विदारक परिस्थिती आता जिल्हावासियांची झाली आहे.त्याला काही प्रमाणात येथील व्यवस्था आणि धोरणही कारणीभूत आहे.७ ऑगस्ट रोजी अविनाश बारगळ यांनी पोलिस अधीक्षक म्हणून जिल्ह्याचा पदभार घेताच अनेक चांगल्या कारवायांना हात घातला.वेगवेगळ्या सततच्या मोहिमेमुळे जिल्ह्यातील गुन्हेगारांमध्ये त्यांची वचक निर्माण झाली होती. विधानसभा निवडणूक अनुषंगाने अनेक प्रतिबंधात्मक कारवायाही झाल्या.परंतु निवडणुकीनंतर जिल्ह्यात सामाजिक सलोखा टिकविण्यात आणि अतिरेकी राजकीय दबाव जुगारण्यात त्यांना यश आले नाही.त्यात लगेच केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून खून करण्यात आला. त्या पाठोपाठ लगेच बीड शहरात (firing)गोळीबार झाला आणि परळीत अमोल डुबे या उद्योजकाचे अपहरण. तसेच मस्साजोगमधील पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्याला दोन काेटींची खंडणी मागण्यात आली. यात वाल्मिक कराड यांचे नाव आले.या सर्व घटनांमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. हेच सर्व मुद्दे हिवाळी अधिवेशनात शेवटपर्यंत गाजले. सत्ताधारी आणि विरोधी आमदारांनी या सर्व प्रकरणांवर आवाज उठविला. हे सर्व पाहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारगळ यांची तातडीने बदली करत असल्याचे सभागृहात सांगितले.दरम्यान बारगळ यांच्या पोलीस अधिक्षक म्हणून काम करताना काही चुका झाल्या हे नाकारता येणार नाही, मात्र अनेक दिवसाच्या सडलेल्या व्यवस्थेचे खापर चार महिन्यापूर्वी आलेल्या अधिकाऱ्यावर फोडले गेले.मस्साजोगची घटना घडली तेंव्हा तर ते रजेवर होते.त्यांना या घटनेची माहितीही नव्हती.मात्र सभागृहात थेट त्यांचा बळी देण्यात आला.आता तो सरकारचा आणि सभागृहाचा अधिकार आहे, पण याच सभागृहात वर्षभरापूर्वी तत्कालीन पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांची पाठराखण करणारे सरकार याच महायुतीचे होते. ठाकूर यांच्या कार्यकाळात अवैध धंदयांचा तर बाजराच मांडण्यात आला होता. गोळीबार, चोऱ्या, दरोडे, खून, मल्टीस्टेटमध्ये ठाकूर यांची भूमिका चर्चेत होती. अगदी त्यांच्या आर्थिक गुन्हे शाखेचा पोलीस निरीक्षक कोटयावधीची लाच मागताना एसीबीच्या गळाला लागला होता, जिल्हातील हिंचासार ठाकूर यांच्या काळातीलच.कोट्यवधींची नुकसान या घटनेत झाले.बीड जिल्ह्यात भयाण अशी घटना घडली होती.मात्र तरीही नंदकुमार ठाकूर यांची उचलबांगडी करण्याचे सामर्थ्य तेंव्हा देवेंद्र फडणवीस यांनी दाखविले नाही.उलट सभागृहात त्यांना पाठिशी घालण्याचा दुर्दैवी प्रकार घडला होता.तेंव्हाची घटना ही गंभीर नव्हती असं कदाचित सरकारचे मत असले.मस्साजोग आणि हिंसाचाराच्या घटनेची बरोबरी होणार नाही.सरपंचाची हत्या दुर्दैवीच आहे. यातील दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी. त्यात कोणालाही सूट मिळण्याचे कारण नाही.मात्र फडणवीस यांनी जिल्ह्यातील दोन मोठ्या घटनेत तेंव्हाची घेतलेली भूमिका आणि आता उचलेले पाऊल जिल्ह्यात चर्चचा विषय ठरत आहे. बारगळ यांच्या बाबतीत 'खाया पिया कुछ नही, गिलास तोडा बारह आना' म्हणण्याची वेळ बीड पोलीस दलावर आली आहे.
होयबा सुध्दा लाडका असावा लागतो
सध्याच्या परिस्थितीत केवळ बीडमध्येच नाही, राज्यातच प्रशासकीय व्यवस्थेत सत्तेच्या होयबांचाच भरणा आहे. चांगली पोस्ट मिळविण्यासाठी आणि टिकविण्यासाठी भले भले लोक 'होयबा' व्हायला तयार असतात. त्यामुळे व्यवस्थेला होयबांची कमतरता नसते. मात्र आता केवळ 'होयबा' असणे पुरेसे राहिलेले नाही, तर त्यासोबतच व्यवस्थेचे 'लाडके' असणे महत्वाचे झाले आहे. काही प्रकरणात अविनाश बारगळ यांच्या भूमिकेवर होयबा असण्याचा ठपका ठेवता येईलही पण मागच्या चार महिन्यात ते व्यवस्थेतील कोणालाच 'लाडके' वाटले नाहीत हे देखील त्यांच्या उचलबांगडीचे एक कारण असेल कदाचित.