Advertisement

नागपुरातला मंत्र्यांचा शपथविधी आणि बीड जिल्ह्याचे बदलले राजकारण

प्रजापत्र | Sunday, 15/12/2024
बातमी शेअर करा

  संजय मालाणी

बीड दि. १४: आज नागपुरात राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होण्याची घटना तशी अपवादात्मकच, २३ वर्षापुर्वी ती घडली होती. त्यावेळी छगन भुजबळ शिवसेनेतून कॉंग्रेसमध्ये येऊन मंत्री झाले, आणि त्यानंतर लगेच बीड जिल्हयाच्या आणि राज्याच्याही राजकारणाला दिर्घकालीन कलाटणी मिळेल अशी घटना घडली. ती घटना होती गोपीनाथ मुंडे यांच विरोधीपक्ष नेता होणं. ती आठवी विधानसभा होती. १९९० ला विधानसभेच्या निवडणुका झाल्या. भाजप आणि शिवसेना त्यावेळी युती म्हणून लढले. सत्ता अर्थातच कॉंग्रेसची आली आणि शिवसेनेचे मनोहर जोशी विरोधीपक्ष नेते बनले. त्यावेळी शिवसेनेचे ५४ आमदार निवडून आले होते. १९९१ मध्ये मात्र शिवसेनेला धक्का बसला, नागपूरचे हिवाळी अधिवेशन सुरु असतानाच छगन भुजबळ शिवसेनेच्या ५४ मधील १८ आमदारांना घेऊन बाहेर पडले. त्यातील ६ नंतर स्वगृही परतले, आणि १२ आमदारांसोबत छगन भुजबळ कॉंग्रेसवासी झाले. त्यांनी नागपुरातच मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत आलेले डॉ. गोडे राज्यमंत्री झाले. मात्र या साऱ्या बंडामुळे विधानसभेतले शिवसेनेचे संख्याबळ घटले आणि विरोधीपक्ष नेतेपदावर भाजपने दावा केला. मनोहर जोशींना हे पद सोडावे लागले आणि भाजपने या पदावर निवड केली ती गोपीनाथ मुंडेंची. त्यावेळी मुंडे- महाजन हे महाराष्ट्र भाजपचे तरुण चेहरे होते, वसंतराव भागवतांनी त्यावेळी भाजपला ' माधवं' फॅक्टरची ओळख करुन दिलेली होती. १९८५ साली झालेला पराभव विसरुन ९० च्या विधानसभेत गोपीनाथ मुंडेंची आमदारकिची दुसरी टर्म सुरु झाली होती, आणि १२ डिसेंबर १९९१ ला ते विधानसभेचे विरोधीपक्ष नेता बनले. पक्षाने त्यांना दिलेली ही वाढदिवसाची भेट असावी कदाचित. मुंडे विरोधीपक्ष नेते बनले आणि राज्यात राजकीय घटनाही वेगाने घडल्या. बाबरी विध्वंसानंतर मुंबईत बॉम्बस्फोट, दंगली झाल्या, सुधाकरराव नाईकांना बाजुला करत शरद पवार मुख्यमंत्री झाले. आणि मग सभागृहात सुरु झाली जुगलबंदी पवार आणि मुंडेंची. गोपीनाथ मुंडेंच्या भाषणाने सभागृह आणि सभागृहाबाहेरचे वातावरण ढवळून निघाले. गोवारी हत्याकांडानंतर त्यांनी काढलेला मोर्चा, त्यांची संघर्ष यात्रा, त्यांनी पवारांवर उडवलेली आरोपांची राळ यातूनच १९९५ ला राज्यात सत्तापरिवर्तन झाले आणि राज्यात युतीचे सरकार आले, गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले. राज्यात हे होत असतानाच बीड जिल्ह्याचे राजकारण देखील बदलत गेले. १९९० पर्यंत गोपीनाथ मुंडेंचा प्रभाव बीड जिल्हयात फारसा नव्हता, जालण्याचे राख, शेजारच्या नगर जिल्ह्यातील बबनराव ढाकणे, बीड जिल्हयात रघुनाथराव मुंडे, पंडितराव दौंड हे वंजारा समाजातील नेतृत्व होते. पण गोपीनाथ मुंडे विरोधीपक्ष नेते झाले आणि वंजारा समाजाने त्यांना आपला एकमुखी नेता निवडले. पुढे बीड जिल्ह्याचे आणि राज्याचे राजकारण देखील मुंडे केंद्री झाले. सत्तेचा केंद्रबिंदू परळी झाली ती त्यामुळेच. आणि या सर्वांच्या मुळाशी होता छगन भुजबळांचा नागपुरात मंत्री म्हणून झालेला शपथविधी. आता २३ वर्षानंतर पुन्हा नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होत आहे. यात बीड जिल्ह्यातील कोणाची वर्णी लागणार, मुंडेंच्याच कुटुंबातले दोघे मंत्री होणार का? आणि आजच्या होऊ घातलेल्या शपथविधीचा बीड जिल्ह्यावर, जिल्हयाच्या राजकारणावर काय परिणाम होणार हे काळच ठरवेल.

Advertisement

Advertisement