Advertisement

विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकरांनी भरला अर्ज

प्रजापत्र | Sunday, 08/12/2024
बातमी शेअर करा

मुंबई- विधानसभा अध्यक्षपदासाठी आज (रविवार) राहुल नार्वेकर यांनी अर्ज भरला आहे. यावेळी त्‍यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्‍थित होते. नार्वेकर यांनी पुन्हा एकदा अर्ज भरल्‍याने महायुती आणि भाजपने नार्वेकरांना पुन्हा एकदा दुसऱ्यांदा संधी दिल्‍याचे दिसून येत आहे. दरम्‍यान उद्या नार्वेकरांच्या नावाची घोषणा होण्याची शक्‍यता आहे. त्‍यामुळे विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल नार्वेकर विराजमान होणार असल्‍याचे निश्चित झाले आहे.

 

 

विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी सोमवारचा दिवस नक्की करण्यात आला आहे. त्यासाठी रविवारी दुपारी बारापर्यंत प्रस्ताव सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. २८८ सदस्यांच्या सभागृहात महायुतीकडे २३७ जणांचे संख्याबळ आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराचा विजय नक्की आहे. महायुतीच्या जागावाटपात विधानसभेचे अध्यक्षपद भाजपकडे असणार आहे. त्यानुसार भाजपने पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांच्याच नावाला पसंती दिल्याचे समजते.

शिंदे सरकारच्या अडीच वर्षांच्या काळातही राहुल नार्वेकर यांच्याकडेच विधानसभेचे अध्यक्षपद देण्यात आले होते. या कार्यकाळात नार्वेकर यांचा वकिली पेशातील अनुभव सत्ताधारी महायुतीच्या कामी आला होता. विशेषतः शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाच्या दावेदारीवरील सुनावणीत नार्वेकरांच्या अनुभवाचा फायदा सत्ताधार्‍यांना मिळाला. त्यामुळे नव्या विधानसभेतही अध्यक्षपद नार्वेकरांकडेच सोपविण्याचा भाजपचा मानस आहे.

Advertisement

Advertisement