चौसाळा दि.५ (वार्ताहर)- हिंगणी (बु) येथील शेतकरी शहाजी वायसे यांच्या घराबाहेर ठेवलेले सोयाबीनची ६२ कट्टे बुधवार (दि.४) रोजी मध्यरात्री चोरून नेल्याची घटना घडली. या घटनेमुळे चौसाळा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हिंगणी (बु.) येथील शेतकरी शहाजी शंकरराव वायसे यांनी घराबाहेर सोयाबीनच्या पोत्यांची थप्पी लावलेली होती. बुधवारी रात्री वायसे कुटुंबातील सगळे झोपलेले असताना मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी सोबत आणलेले वाहन चौसाळा नांदूर रस्त्यावर उभे केले. चोरट्यांनी सोबत आणलेल्या माणसाच्या साह्याने सोयाबीन थप्पीतील ६२ पोते जवळपास एक हजार फूट अंतरापर्यंत पाठीवर घेऊन जात. सोबत आणलेल्या वाहनात भरून ते लंपास केले. चोरीला गेलेले सोयाबीन अंदाजे ४० क्विंटल इतके होते. अज्ञात चोरट्यांनी सुमारे दीड लाख रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला असून नेकनूर पोलिसांनी गुरुवारी सकाळी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी नेकनूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.