बीड दि.५ (प्रतिनिधी)- भाजी खरेदी करून घराकडे निघालेल्या सेवानिवृत्त इंजिनिअरला दोन भामट्यांनी दिवसाढवळ्या लुटले. ‘तुमच्या जवळील सोन्याची चैन व अंगठी काढून ठेवा’, असे म्हणत या चोरट्यांनी अंगठी व सोन्याची चैन चोरली. ही घटना आज (दि.५) रोजी शहरातील चाणक्यपुरी भागात घडली. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी येऊन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासायला सुरुवात केली होती.
सविस्तर माहिती अशी कि,सेवानिवृत्त इंजिनिअर पोपटराव जोगदंड हे भाजी खरेदी करून घराकडे जात होते. चाणक्यपुरी जवळ त्यांना दोन भामटे भेटले. त्यांनी जोगदंड म्हटले की, ’आम्ही प्रशासनाचे माणसं आहोत, सध्याची परिस्थिती खराब आहे, चोर्या वाढलेल्या आहेत, त्यामुळे तुमच्या गळ्यातील चैन हातातील अंगठी काढून ठेवा,’ असे म्हटल्यानंतर जोगदंड यांनी चैन व अंगठी काढून ठेवली. हे दागिने हाथरुमालमध्ये गुंडाळून ठेवले. हाथरुमाल इकडे द्या, असे म्हणत चोरट्यांनी हातचालाखी करत चैन,अंगठी पळविली. आपल्याला दिवसाढवळ्या लुटण्यात आल्याचे जोगदंड यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन आजुबाजुच्या घरातील व दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासायला सुरुवात केली होती.