Advertisement

शिक्षक साजेद अली खून प्रकरणात १४ जण दोषी

प्रजापत्र | Thursday, 05/12/2024
बातमी शेअर करा

 बीड दि.५ (प्रतिनिधी) शहरातील बहुचर्चित शिक्षक साजेद अली खून प्रकरणात बीड येथील न्यायालयाने १८ पैकी १४ आरोपींना दोषी ठरवले आहे. या प्रकरणी आता सोमवार दि.९ डिसेंबर रोजी निकाल देणार असल्याचे कोर्टाने नमूद केले आहे. गुजर खान उर्फ अन्वर खान मिर्झा खान याच्यासह १४ जणांना दोषी ठरवत सरफराज अयाजओद्दीन काझी, फैज मोहम्मद खान आणि सय्यद नुर उर्फ मिना या तिघांना न्यायालयाने निर्दोष मुक्त केले आहे. दरम्यान कडेकोट पोलीस बंदोबस्तात सर्व आरोपींना न्यायालयात आणण्यात आले होते. या प्रकरणातील आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल असल्याने न्यायालय परिसरातही एक डीवायएसपी, चार पीआय यांच्यासह १५० पोलीस अधिकारी,कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता, केसशी संबंधीत व्यक्तींनाच आतमध्ये सोडण्यात आले होते. या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते.

 

 

बीड शहरातील बालेपीर भागात १९ सप्टेंबर २०१९ रोजी सैनिकी विद्यालयातील शिक्षक सय्यद साजेद अली (वय ३८) यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात एकूण १८ आरोपींविरुध्द शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला होता. पोलीसांनी या प्रकरणाचा तपास करून दोषारोपत्र न्यायालयात दाखलकेले होते. सदरील प्रकरण जिल्हा न्यायालयातील विशेष न्यायाधीश सुरेखा पाटील यांच्या न्यायालयात सुरू होते. या प्रकरणी न्यायालयाने एकूण ४४ साक्षीदार तपासले तर बचाव पक्षातर्फे ५ साक्षीदार तपासण्यात आले. सदरील प्रकरणात फिर्यादी व साक्षीदार, इतर परिस्थितीजन्य पुरावा,वैद्यकीय पुरावा, न्याय वैद्य प्रयोग शाळा यांचा अहवाल तसेच सहाय्यक सरकारी वकील अॅड. अजय श्रीमंतराव तांदळे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश १ तथा विशेष मोक्का न्यायाधीश श्रीमती एस. आर. पाटील यांनी गुजर खान सह १४ जणांना दोषी ठरवले तर तिघांची निर्दोष मुक्तता केली. याप्रकरणी सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अॅड. अजय तांदळे यांनी काम पाहिले. त्यांना जिल्हा सरकारी वकिल तथा शासकीय
अभियोक्ता अॅड. अजय राख यांनी मार्गदर्शन केले व सर्व सहाय्यक वकिल यांचे सहकार्य लाभले. सदर प्रकरणात पैरवी अधिकारी पीएसआय बी.व्ही. जायभाये यांनी त्यांना सहकार्य केले.

 

 

बीडच्या विशेष मोक्का न्यायालयाचा पहिलाच मोठा निकाल
बीड येथील बहुचर्चित साजेद अली खून प्रकरणात मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल झालेले असल्याने सदरील प्रकरण बीडच्या विशेष मोक्का न्यायालयात चालवण्यात आले. आत्तापर्यंतच्या इतिहासात विशेष मोक्का न्यायालयाचा हा पहिलाच मोठा निकाल असुन तब्बल १४ जणांना दोषी ठरवण्यात आले आहे. त्यामुळे न्यायालयाने दिलेला निकाल महत्वाचा ठरला असुन आता मोक्का न्यायालय सोमवार दि.९ डिसेंबर रोजी काय निकाल देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

या १४ जणांना ठरवले दोषी
अन्वर खान उर्फ गुजर खान मिर्झा खान (रा. गुलशन नगर बालेपीर बीड), मुजीब खान मिर्झा खान पठाण, सय्यद नासेर सय्यद नुर, सय्यद शाहरूख सय्यद नुर, शेख उबेद शेख बाबू,शेख सरफराज उर्फ सरू डॉन, शेख शहेबाज शेख कलीम (रा. रोशनपुरा बीड), शेख अमर शेख अकबर (रा. गुलशन नगर बीड), शेख बबर शेख युसूफ (रा. खासबाग बीड),आवेज काझी (रा. काझी नगर बालेपीर बीड), शेख इम्रान उर्फ काला शेख रशीद (रा. काझी नगर बालेपीर बीड), शेख
मझहर उर्फ काल्या उर्फ हाफ मर्डर शेख रहीम (रा. बांगर नाला बीड), बबर खान गुल मोहम्मद खान पठाण (रा. शहेबाज कॉलनी नेकनूर), शेख वसीम शेख बुन्हानोद्दीन (रा. रोशनपुरा बालेपीर बीड) या चौदा जणांना दोषी ठरवले आहे. या प्रकरणात एकूण १८ जणांविरूध्द गुन्हा दाखल झालेला
असुन त्यापैकी सतरा जण अटक असुन इम्रान पठाण उर्फ चड्डा हा फरार आहे.

Advertisement

Advertisement