बीड दि. ४ (प्रतिनिधी ) : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पकडण्यात आलेल्या वाळूच्या गाड्यांमधील एक हायवा गायब झाल्याच्या प्रकरणात तीन दिवसांनंतरही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे 'एक चोर सबपे भारी' झाल्याच्या चर्चा सध्या जोरात सुरु आहेत.
बीड जिल्ह्यात वाळू माफियांची किती चलती आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. प्रशासनाच्याच आशीर्वादाने वाळू माफिया किती मस्तवाल होतात आणि ते अगदी प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील कशी हूल देतात हे देखील जिल्ह्याने अनेकदा पहिले आहे. मात्र खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी पकडायला लावलेल्या वाळूच्या गाड्यांपैकी एक गाडी, पळविली जाते आणि ती देखील पोलीस मुख्यालयातून , या गोष्टीमुळे बीडच्या जिल्हा प्रशासनाच्या अब्रूची लक्तरे पार वेशीवर टांगली गेली आहेत. वाळूचा हायवा परस्पर पळविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे बीडचे तहसीलदार तीन दिवसांपासून सांगत आहेत, यासाठी तलाठी, मंडळ अधिकारी यांना प्राधिकृत देखील करण्यात आले आहे , मात्र या साऱ्या घटनेला तीन दिवस उलटल्यानंतरही या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला नाही. पोलीस आणि महसूल विभागाचे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवीत आहेत. त्यामुळे पोलीस मुख्यालयातून वाहन पळवून नेल्यानंतरही काहीच होऊ शकत नाही हे वाळू माफियांनी पुन्हा सिद्ध केले आहे. एक चोर सबपे भारी झाल्याच्या चर्चा आता रंगवल्या जात आहेत.
पोलिसांकडे 'त्या' फोनची रेकॉर्डिंग !
दरम्यान या प्रकरणात पहिल्या दिवसापासून संशयाची सुई महसूल अधिकाऱ्यांकडे जात आहे. महसूल कर्मचारीच असलेल्या एका 'काळे ' धंदे करणाऱ्याच्या माध्यमातून एका वाळू माफियाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली होती अशीही चर्चा आहे. त्यानंतर महसूलच्या एका अधिकाऱ्याने 'गाडी सोडून देण्याचा ' फोन मुख्यालयातील पोलीस अधिकाऱ्याला केल्याचे सांगितले जाते. सदर अधिकाऱ्याने आपल्या वरिष्ठांना सदर फोनची रेकॉर्डिंग दिली असल्याची माहिती आहे. त्यामुळे देखील आता गुन्हा दाखल करायचा कसा आणि कोणावर हा प्रश्न कदाचित पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांना पडला असावा. फोन करणारा तो अधिकारी कोण याबद्दल देखील वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.
आता दंड लावण्याच्या हालचाली
इतके सारे घडल्यानंतरही महसूल विभाग वाळू माफियांनाच वाचविण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती आहे. झाले गेले गंगेला मिळाले असे समजून त्या वाहनावर दंडात्मक कारवाई करून प्रकरण रफादफा करता येतेका या दृष्टीने देखील काहींनी हालचाली सुरु केल्याची माहिती आहे