Advertisement

भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत तरी कोठे ?

प्रजापत्र | Thursday, 28/11/2024
बातमी शेअर करा

बीड-विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे बीडचे जिल्हाध्यक्ष असलेल्या राजेंद्र मस्के यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिल्यानंतर पक्षाने जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी परिवाराची पार्श्वभूमी असलेल्या शंकर देशमुख यांना दिली.मात्र विधानसभेची निवडणूक असेल किंवा त्यानंतरचा घटनाक्रम,शंकर देशमुख कोठेच दिसत नसल्याची चर्चा आहे.भाजपच्या कार्यकर्त्यांना देखील जिल्हाध्यक्ष या काळात फारसे भेटले नसल्याचे बोलले जाते.त्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत तरी कोठे असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

 

दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि त्यानंतर पंकजा मुंडे यांचा जिल्हा असल्याने असेल कदाचित,पण बीड जिल्ह्यात भाजपचे जिल्हाध्यक्षपद नेहमीच चर्चेत राहिलेले आहे. आर.टी.देशमुख असतील किंवा रमेश पोकळे अगदी राजेंद्र मस्के देखील,भाजपच्या जिल्हाध्यक्षपदावर असलेल्या या व्यक्तींना या पदाचे महत्व वाढविले होतेच,त्यासोबतच सामन्यांमध्ये संपर्क देखील वाढविलेला होता.मात्र विधानसभा निवडणुकीच्या अगोदर झालेल्या काही घडामोडीनंतर राजेंद्र मस्के यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिली, त्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्षपद रिक्त झाले.पक्षाने 'परिवाराची' पार्श्वभूमी म्हणून,संघटनात्मक अनुभव म्हणून शंकर देशमुख यांच्याकडे या पदाची सूत्रे सोपविली.खरेतर भाजपमधीलच अनेकांसाठी हे नाव तसे अनोळखी होते. शंकर देशमुख यांनी यापूर्वी तसे आष्टी तालुक्यात संघटनात्मक काम केलेले होते, पण जिल्हाव्यापी चेहरा अशी त्यांची फारशी ओळख झालेली नाही.त्यातच संपूर्ण निवडणूक काळात महत्वाच्या सभांना उपस्थिती लावण्यापलीकडे शंकर देशमुख यांचा निवडणूक प्रचारात फारसा 'प्रभाव' जाणवला नाही.किंवा त्यांनी स्वतःहून पक्षाच्या कार्यकर्ता,उमेदवार यांच्यासाठी फार काही केल्याचे समोर आले नाही.आता निवडणुकीमध्ये महायुतीला बहुमत मिळाले,त्यानंतर अनेकजण आपला आनंद व्यक्त करताना दिसतात, मात्र त्या उत्साहामध्ये देखील शंकर देशमुख कोठेच नाहीत. त्यामुळे भाजपचे जिल्हाध्यक्ष नेमके आहेत तरी कोठे असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.

Advertisement

Advertisement