आष्टी गावात मराठा समाजाची मतं ही बोटांवर मोजण्याइतकी आहेत, असं विधान बबनराव लोणीकर यांनी केली आहे. त्यांच्या या विधानाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. त्यांच्या विधानाचा व्हिडीओसुद्धा वायरल झाला आहे. यावरून आता विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. दरम्यान, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही या विधानावरून बबनराव लोणीकर यांना लक्ष्य केलं आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे?
मनोज जरांगे पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना लोणीकर यांच्या विधानाबाबत विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, लोणीकरांचे विधान खेदजनक आहे. या नेत्यांच्या अशा वागण्याने मराठा समाज अडचणीत यायला लागला आहे. अशा लोकांना मराठा समाजाने थारा देऊ नये. त्यांना धडा शिकवला पाहिजे. त्याशिवाय ते जागेवर येणार नाही. त्यांना रस्त्यावर आणण्याची ताकद केवळ मराठा समाजात आहे, त्यांना समाज नक्कीच रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.