लोकसभेला जे वारं होतं, तेच वारं आताही आहे, असे म्हणत अभिनेते रितेश देशमुख यांनी आपले लहान भाऊ धीरज विलासराव देशमुख यांच्यासाठी लातूर ग्रामीण येथे प्रचार सभा घेतली. यावेळी त्यांनी शिक्षणाचा लातूर पॅटर्न महाराष्ट्रात प्रसिद्ध असल्याचे सांगितले पण लातूरमधील मुलांनाच रोजगार नाही. रोजगार देण्याची सरकारची जबाबदारी आहे. पण लोकांकडे रोजगार नाही. पिकांना भाव नाही. येत्या २० तारखेला मतदारांनी मतदान करताना या मुद्द्यांचा विचार करावा, असे आवाहन रितेश देशमुख यांनी केले. तसेच भाजपाकडून होत असलेल्या धर्माच्या प्रचारावरही रितेश देशमुख यांनी जोरदार टीका केली.
भगवान श्रीकृष्णाचा दाखला देऊन रितेश देशमुख म्हणाले, “कर्म हाच धर्म आहे. काम करत राहणे म्हणजे कर्म करणे आणि कर्म म्हणजेच धर्म. जो प्रामाणिकपणे काम करतो, त्यालाच धर्म करणे म्हणतात. पण जो काम करत नाही त्याला गरज पडते धर्माची. सगळे म्हणतात की धर्म धोक्यात आहे, प्रत्येक पक्ष म्हणतो धर्म धोक्यात आहे. धर्म बचाव, धर्माला वाचवा, असं म्हटलं जातंय. आमचा धर्म आम्हाला प्रिय आहे. प्रत्येक व्यक्तीला आपला धर्म प्रिय असलाच पाहिजे. खरं म्हणजे ते (राजकीय पक्ष) धर्माला प्रार्थना करतात की, आमचा पक्ष धोक्यात आहे, आम्हाला वाचवा. काही गरज नाही अशा भुलथापांना बळी पडायची.”
रितेश देशमुख मतदारांना आवाहन करताना म्हणाले, जे धर्माची गोष्ट करतात, त्यांना सांगा धर्माचं आम्ही बघून घेतो, आधी आमच्या कामाचं बोला. आमच्या पिक-पाण्याला काय भाव देणार, आमच्या आई-बहिणी सुरक्षित आहेत की नाही, हे सांगा. २० नोव्हेंबरनंतर धीरज देशमुख यांच्याकडे फार मोठी जबाबदारी येणार आहे. अमित देशमुख आणि धीरज देशमुख यांच्याकडे काम करण्याची धमक आहे. यावेळी सरकार महाविकास आघाडीचंच येणार, याबद्दल मला शंका नाही.