निवडणुकीच्या प्रचारासाठी विविध पक्षांकडून सिने क्षेत्रातील कलाकारांना पाचारण केलं जात आहे. काल (४ नोव्हेंबर) ठाण्यात झालेल्या मनसेच्या सभेत शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे उपनेते शरद पोंक्षे हजर होते. तर, आजपासून चला हवा येऊ द्या फेम भाऊ कदम राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचा प्रचार करणार आहे. भाऊ कदम या पक्षाचा अधिकृत स्टार प्रचारक असणार आहे. परंतु, त्याने अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला नाही. अजित पवारांची भेट घेतल्यानंतर त्याने एबीपी माझाशी साधलेल्या संवादात याबाबत माहिती दिली.
भाऊ कदम म्हणाला, अजित पवारांबरोबर माझी सदिच्छा भेट झाली. अजित पवार कलाकारांना मान देणारे आणि त्यांचे प्रश्न सोडवणारे नेते आहेत. त्यांनी आताच अनुदानाचा प्रश्न सोडवला. कलाकारांच्या समस्या पूर्णत्वास न्यायचे असतील तर ते चांगले मार्गदर्शक आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रचाराला जायला काहीच हरकत नाही. त्यांनी आमच्यासाठी केलं आहे तर आम्हीही त्यांच्यासाठी प्रचार करणार.”
अद्याप पक्षप्रवेश नाही
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात अद्याप पक्षप्रवेश झाला नसल्याचं भाऊ कदमने स्पष्ट केलं. पण तो पुढे असंही म्हणाला की पक्षात जाण्यास हरकत नाही. परंतु, इंडस्ट्रीमध्ये अजून खूप कामं करायची आहेत. दादा आमच्या पाठीशी आहेत. मी जरा लोकांचं मनोरंजन करतो, दादा आमचं मनोरंजन करतील.”