मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या मैदानात स्वबळावर उतरलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला धक्का बसला आहे. काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता, तर आज राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महिला शिलेदाराचा अर्ज छाननीदरम्यान बाद झाल्याची माहिती समोर आली आहे. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मनसेच्या उमेदावर प्रशंसा मनोज अंबेरे यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याची मुदत काल संपली. त्यानंतर आजपासून सर्व उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यामध्ये अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरलेल्या प्रशंसा मनोज अंबेरे यांचा अर्ज बाद झाला आहे. अंबेरे या अकोल्यातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने १३८ उमेदवार जाहीर केले होते, मात्र आता एक अर्ज बाद झाल्यामुळे मनसेचे १३७ अधिकृत उमेदवार असतील.
अर्ज बाद होण्याचे कारण काय?
प्रशंसा अंबेरे यांनी आपल्या उमेदवारीचा रितसर अर्ज दाखल केला. मात्र तपासणीदरम्यान प्रशंसा यांचा अर्ज रद्द करम्यात आला आहे. विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी वयाची किमान २५ वर्षे पूर्ण असावी लागतात. मात्र प्रशंसा अंबेरे यांचे वय २४ वर्षे असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या प्रतिज्ञापत्रातही वयाचा उल्लेख आहे. त्यामुळे अवघ्या काही महिन्यांनी त्यांची संधी हुकली आहे. मनसेसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.