दैनंदिन लागणाऱ्या सर्वच वस्तूंच्या किमतीमध्ये सध्या मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. खाण्याच्या वस्तू, शिक्षण आणि आरोग्यासंदर्भातील उपचारांसह सर्वच गोष्टीच्या खर्चात दुप्पट वाढ झाल्यामुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. या महागाईने होरपळून निघालेल्या सर्वसामान्य जनेतेला आता राज्य सरकारने आणखी एक धक्का दिला आहे. यापुढे १०० आणि २०० रुपयांच्या मुद्रांक शुल्कसाठी ५०० रुपये मोजावे लागणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागणार आहे.
खरेदी खत आणि हक्क सोडपत्रासाठी यापुढे आता ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क मोजावे लागणार आहे. याआधी १०० आणि २०० रूपयांचे मुद्रांक शुल्क लागत होते. मात्र, हे बंद करून यापुढे आता ५०० रुपयांच्या मुद्रांकावर सर्व व्यवहार करावे लागणार आहेत. याची अंमलबजावणी आजपासून (१६ ऑक्टोबर) सुरु झाली आहे. महाराष्ट्र मुद्रांकाच्या अधिनियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्यपालांनी सोमवारी (ता.१४) अध्यादेश काढला होता. त्यानंतर त्याची अंमलबजावणी आज १६ ऑक्टोबरपासून सुरु झाली आहे.
दरम्यान, महायुती सरकारने महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम १९९८ मध्ये सुधारणा करत आता प्रतिज्ञापत्रे, करारनामे आणि संबंधित कागदपत्रांवरील मुद्रांक शुल्क सध्याच्या १०० रुपयांवरून ५०० रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल विभागाच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्र मुद्रांक कायद्यातील दुरुस्तीमुळे मुद्रांक शुल्क आणि नोंदणीमधून मिळणाऱ्या राज्याच्या महसूलामध्ये जवळपास दोन हजार कोटी रुपयांची वाढ होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, खरं तर राज्य सरकारच्या महसूलाचा मुंद्राक शुल्क हा एक महत्वाचा स्त्रोत आहे. या अनुषंगानेच आता राज्य सरकारने मुद्रांक शुल्कांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेत मुद्रांक शुल्काच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. खरेदी खत, हक्क सोडपत्र, दस्त नोंदणी किंवा सदनिकांच्या विक्री व्यवहार नोंदणीसाठी आधी १०० रूपयांचे मुंद्राक शुल्क मोजावे लागत होते. मात्र, यासाठी यापुढे आता ५०० रूपयांचे मुंद्राक शुल्क मोजावं लागणार आहे. यामध्ये नोटरी करणे किंवा बँकेमधून कर्ज घेण्यासाठी १०० रुपयांचे मुंद्राक शुल्क द्यावे लागायचे. पण आता याच मुंद्राक शुल्कसाठी ५०० रूपय लागणार आहेत.