बीड : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा सर्वाधिक प्रभाव बीड जिल्ह्यात दिसून आलेला आहे. एकतर हा जिल्हा जरांगे यांचा स्वतःचा, त्यातच आंदोलन स्थळाच्या नजीकचा , पुन्हा अनेक वर्षांपासून जिल्ह्याचे राजकारण ओबिसिकेंद्री असल्याने मराठा राजकारणाला आता मोठी संधी असल्याच्या आशा पल्लवित झालेला, त्यामुळॆच या जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात जरांगे फॅक्टरचा विचार करावाच लागणार अशी परिस्थिती. राजकीय पक्षांना देखील उमेदवार ठरविताना याचा विचार करावाच लागणार असे चित्र आहे. आणि जरांगे यांच्या समर्थनावर आमदारकीची स्वप्ने पाहणाऱ्यांना देखील मनोज जरांगे यांच्या मनात नेमके आहे तरी काय हा एकच प्रश्न सतावत आहे .
राज्य विधानसभेच्या निवडणुकांसाठी आचार संहिता लागली आहे. आता मतदानासाठी उंचापुरा एक महिना शिल्लक असल्याने सर्वांनाच उमेदवार निश्चितीची घाई आहे. अशावेळी मनोज जरांगे काय भूमिका घेतात याची उत्सुकता बीड जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात आहे. नारायणगडावर झालेल्या दसरा मेळाव्याच्या वेळी 'आचारसंहिता लागू द्या , मग भूमिका जाहीर करू ' असे मनोज जरांगे म्हणाले होते , त्यामुळे आता जरांगे नेमकी भूमिका काय घेणार याची उत्सुकता आणि धाकधूक सर्वांनाच आहे. मनोज जरांगे आतापर्यंत 'मी समाजाचे ऐकून निर्णय घेईल ' असे म्हणत होते , मात्र दसरा मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी 'आता एकदा माझे ऐका ' असे आवाहन देखील केले आहे, त्यामुळे त्यांना अपेक्षित 'उलथापालथ ' म्हणजे लोकसभेसारखी 'पाडापाडी' आहे, का कोणाच्या तरी पाठीवर आशीर्वाद हे अद्याप स्पष्ट व्हायचे आहे.
२५ हजाराचा निकष ?
मनोज जरांगे यांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. त्यांच्या मनात काय आहे हे ते कोणालाच कळू देखील देत नाहीत, मात्र निव्वळच नवख्या उमेदवाराच्या मागे शक्ती उभी करण्याचा निर्णय त्यांनी घेण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे. लोकसभेच्या तुलनेत विधानसभेला मराठा मतदान एकगठ्ठा होणार नसल्याचे राजकीय निरीक्षकांचे अंदाज आहेत आणि याची कल्पना साहजिकच मनोज जरांगे यांना देखील आहेच. त्यामुळेच ज्या कोणत्या उमेदवाराकडे स्वतःची अशी किमान २५ हजार मते असतील, त्याच्या मागे आपली कुमक उभी करायची आणि त्या उमेदवाराला विजयाच्या मार्गावर आणायचे असे आडाखे किंवा समीकरणे मनोज जरांगे जुळवू शकतात अशी देखील माहिती मिळत आहे. अर्थात हे सारे अंदाज असून जरांगे काय करतील हे मात्र कोडेच आहे.