माजलगाव दि. १3 (प्रतिनिधी ) : युतीची महायुती झाली आणि त्यात पुन्हा महायुतीमध्ये युतीवाले आतापर्यंत ज्यांच्या विरोधात लढत होते, त्या राष्ट्रवादीचा समावेश झाला, त्यामुळे आतापर्यंतच्या विरोधकांना सोबत घ्यायचे कसे हा प्रश्न भाजप आणि शिवसेनेला देखील आहे. त्यामुळेच आता जागावाटपावरून देखील ठिकठिकाणी पेच आहे. माजलगाव मतदारसंघात विद्यमान आमदार अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आहेत, त्यामुळे हा मतदारसंघ महायुतीत राष्ट्रवादीचा मानला जातो, मात्र याच मतदारसंघातून भाजपचे बाबरी मुंडे यांनी शड्डू ठोकले आहेत. या मतदारसंघातील 'ओबीसी ' शक्तीचा विचार केल्यास बाबरी मुंडेंची बंडखोरी महायुतीसमोर मोठे आव्हान ठरेल.
माजलगाव मतदारसंघाने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलेच रोखले होते. परळी आणि आष्टी मतदारसंघाने महायुतीला मोठी आघाडी दिली, मात्र आघाडीसाठी सोपा वाटणारा माजलगाव मतदारसंघ महायुतीने केवळ बरोबरीत नव्हे तर काहीसा मताधिक्याचा ठेवला. यातूनच या मतदारसंघातील 'ओबीसी ' फॅक्टरची चर्चा झाली होती.
आता या मतदारसंघातून भाजपचे कार्यकर्ते असलेले बाबरी मुंडे यांनी शड्डू ठोकले आहेत. पक्षाने उमेदवारी दिली नाही तर अपक्ष लढण्याची जाहीर घोषणा केवळ बाबरी मुंडे यांनीच नव्हते तर त्यांचे वडील राजाभाऊ मुंडे यांनी देखील केली आहे. माजलगावच्या राजकारणात आ. सोळंके आणि राजाभाऊ मुंडे यांच्यातील रस्सीखेच सर्वांना माहित आहे. विशेष म्हणजे राजाभाऊ मुंडे हे दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि आता पंकजा मुंडे यांचेही अत्यंत निकटवर्तीय आहेत. नुकताच जो दसरा मेळावा भगवान भक्ती गडावर झाला, त्याच्या आयोजनात राजाभाऊ मुंडे यांची भूमिका महत्वाची होती. 'विधानसभा निवडणूक देखील लोकसभेच्याच वाटेने जाणारी असेल, किंबहुना अधिक कडवी असेल ' असे जे मुंडे समर्थकांकडून जाहीरपणे सांगितले जात आहे. , त्यामुळे आता माजलगाव मतदारसंघामध्ये भाजपच्या बंडखोरांकडून महायुतीच्या मतपेढीतले 'ओबीसी ' वेगळे काढले तर महायुतीची मोठी आधीचं होऊ शकते. आज तरी बाबरी मुंडे माजलगाव तालुक्यात पायल भिंगरी लावून फिरत आहेत.
बातमी शेअर करा