मुंबई - अभिनेता सलमान खानच्या जवळचे मित्र आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खान याची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. या हत्येमुळे देशभरात खळबळ उडाली आहे. बॉलिवूडमध्ये यामुळे दहशत निर्माण झाली आहे. या घटनेनंतर सलमान खानच्या घराबाहेर सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्याच्या घराबाहेर बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. कोणत्याही वाहनाला सलमान खान यांच्या घराच्या परिसरात थांबण्यास पोलिसांकडून मनाई करण्यात येत आहे. (Salman Khan)
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे तार लॉरेन्स बिश्नोई गँगशी जोडले जात आहेत. लॉरेन्स बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्विकारली आहे. या दरम्यान सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. कारण लॉरेन्स बिश्नोई सोबत सलमान खानचा जुना वाद आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने अभिनेता सलमानच्या हत्येची धमकी दिली आहे. त्यामुळे त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
सलमान खानला लीलावती रूग्णालयात जाण्यासही मनाई करण्यात आली हाेती. मात्र बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची बातमी समजताच तो स्वत: ला रोखू शकला नाही आणि बाबा सिद्दीकींना पाहण्यासाठी रात्री उशीरा रूग्णालयात पोहोचला होता. सलमान खान यांच्यासोबत यावेळी सुरक्षा रक्षक होते. पोलिसांनी अभिनेता सलमान खान यांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे.