मुंबई : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दिक्षाभूमी नागपूर, बुद्ध लेणी औरंगाबाद, अकोला आणि महाराष्ट्रातील विविध ठिकाणी तथागत गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी प्रवास करणाऱ्या अनुयायांकडून टोल घेतला जाऊ नये, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash ambedkar) यांनी सरकारला केले आहे. तसेच याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना पत्र पाठवून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने टोल न घेण्याची मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, यापूर्वी गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी टोलमुक्तीचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. तर, पंढरीच्या वारीला येणाऱ्या भाविकांकडूनही टोल न घेण्याचा निर्णय राज्य सरकारने आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर घेतला होता. त्यामुळे, आता धम्मचक्र परिवर्तन दिनासाठी नागपूरला येणाऱ्या अनुयायांकडून टोल घेऊ नये, अशी मागणी आंबेडकर यांनी केली आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विजयादशमी दिनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली हा दिवस जगभरातील अनुयायांसाठी सन्मानाचा, मुक्तीचा दिवस असल्याचे ॲड. आंबेडकरांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, दरवर्षीप्रमाणे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त १२ ते १३ ऑक्टोबर २०२४ दरम्यान दिक्षाभूमी नागपूर, बौद्ध लेणी औरंगाबाद, अकोला आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणी लाखो बौद्ध अनुयायी धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यासाठी प्रवास करत असतात. महाराष्ट्र आणि देशभरातील ग्रामीण भागातून लोक येथे तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी प्रवास करत असतात. आम्ही वंचित बहुजन आघाडीकडून मागणी करतो की, आपण धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त प्रवास करणाऱ्या बौध्द अनुयायांकडून आकारण्यात येणारा टोल माफ करावा, असे या पत्रात म्हटले आहे.