ज्या देशात संपत्ती निर्मिती किंवा भांडवल निर्मिती या गोष्टीला फारसे चांगले म्हटले जात नाही त्या वातावरणात भांडवल निर्मिती करतानाच त्या संपत्तीमधून सामान्यांचे कल्याण करता येवू शकते हे केवळ बोलण्यातून नव्हे तर प्रत्यक्ष कृतीतून ज्यांनी दाखवून दिले आणि एखाद्या मोठ्या उद्योग समूहाचा कर्ता धरता समाजात तितक्याच समाजशीलपणे मिसळू शकतो हे ज्यांनी दाखविले अशांपैकी रतन टाटा एक होते. त्यांच्या जाण्याने देशातील एक परोपकारी उद्योजक हरवला आहे.
संस्कृत भाषेत एक सुभाषित आहे, ‘दानाय लक्ष्मी, सकृताय विद्या, चिंता परेषां सुखवर्धनाय’ रतन टाटा यांचे सारे आयुष्य खर्या अर्थाने या सुभाषितात सांगितल्याप्रमाणे होते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. जमशेदजी टाटा यांचे पणतू असल्याचा मोठा वारसा असतानाही टाटा स्टील मध्ये कामगारांसोबत प्रत्यक्ष काम करणारा अभियंता म्हणून रतन टाटांची एक वेगळी ओळख त्यावेळी उद्योग जगताला झाली होती. टाटा समुहाचे तब्बल २२ वर्ष अध्यक्षपद सांभाळताना रतन टाटांनी टाटा उद्योग समूहाला देशाचं नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. रतन टाटांच्या काळात टाटा उद्योग समूहाचा महसूल ४० पटीने तर नफा ५० पटीने वाढला होता. एक उद्योजक म्हणून त्यांचे हे यश निश्चितच मोठे असले तरी उद्योजकांच्या असल्या भांडवली यशाशी सामान्यांना फारसे सोयर सुतक नसते असलेच तर किंबहुना एक प्रकारची असूया असते. अशाच सामाजिक वातावरणात आपण वाढलेलो आहोत मग असे असताना रतन टाटांच्या संदर्भाने मात्र भारतीय समाजात एक आदराची भावना आहे. या विरोधाभासामागचे कारण काय असावे? टाटांना भारतीय समाजमनाने कधी अंबानी-अदानी यांच्या रांगेत बसविले नाही याचे कारण काय असेल?
कोणताही उद्योजक हा त्याच्या उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावत असतोच. रोजगार निर्मितीमध्ये त्या उद्योजकाचे योगदान असते. पण असे असले तरी सारेच उद्योजक समाजप्रिय होत नाहीत कारण सर्वांमध्येच समाजशीलता दिसून येत नसते. ती समाजशीलता रतन टाटांच्या कणाकणातव्यापलेली होती. टाटा समूह एकीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवरील एकेक उद्योग आणि एकेक क्षेत्र पादाक्रांत करीत असताना त्यांनी या समाजातील शेवटच्या घटकाचा देखील कायम विचार केला. औद्योगिक क्षेत्रातील आयकॉन म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते तो व्यक्ती आपल्या उद्योगसमूहातील शेवटच्या कामगाराला कोणत्या अडचणी येऊ शकतात याचा विचार करून त्यांच्याप्रती केवळ सहानूभुती न दाखविता त्या पलिकडे जाऊन ‘अनुभूती’च्या माध्यमातून सामान्यातील सामान्यांच्या समस्या दूर करण्यासाठी उपाययोजना करतो हे उद्योगक्षेत्रात अपवादानेच पाहायला मिळते.
टाटा उद्योग समूहाने शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकास यासाठी जे योगदान दिलेले आहे, टाटा उद्योग समूहाच्या सीएसआर निधीच्या माध्यमातून जे वेगवेगळे समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात समाजासाठी, समाजातील वेगवेगळ्या उपेक्षित घटकांसाठी काम करणार्या संस्था, संघटनांना जी मदत टाटा समूहाच्या माध्यमातून दिली जाते त्याचे प्रेरणास्थान आणि रचयिता रतन टाटा होते. आपल्या स्वत:च्या संपत्तीतील मोठा वाटा समाजकार्यासाठी दान करण्याचे वेगळेपण रतन टाटांनी दाखविले. प्रखर देशाभिमान हे तर जमशेदजी टाटा यांच्यापासूनच टाटा समूहात रूजलेले बीज होते, त्या बीजाला समाजाच्या सर्वांगीण उन्नतीचे अंकुर फुलविण्याचे, वाढविण्याचे काम रतन टाटांनी केले. महाराष्ट्रभूषण, पद्मभूषण, पद्मविभूषण अशा अनेक पुरस्कारांनी रतन टाटांचा गौरव झालेला आहेच पण त्याही पलिकडे रतन टाटांच्या जाण्याने जो सामान्य माणूस हळहळला खर्या अर्थाने तो त्यांच्यातील परोपकारी उद्योजकाचा समाजमनाने केलेला सर्वांत मोठा सन्मान आहे.