Advertisement

चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला पोलिसांनी केली अटक

प्रजापत्र | Sunday, 06/10/2024
बातमी शेअर करा

माजलगाव- दोन दिवसापूर्वी माजलगावातील एका शाळेत अल्पवयीन साडेपाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. या चिमुकलीवर शाळेतीलच शिक्षकानेच अत्याचार केल्याचे उघड झाले. या प्रकरणी नराधम शिक्षक राहुल अंबादास वायखिंडे याला पोलिसांनी अटक केली. 

राज्यात शाळकरी मुलींवरील अत्याचाराच्या  घटनांची मालिका सुरूच असून, बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील एका शाळेतील बालवाडीत साडेपाच वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना (२५ ते २८ सप्टेंबर दरम्यान) घडली होती. या घटनेप्रकरणी मुलीच्या पालकांच्या तक्रारीवरून गुरूवारी अज्ञात व्यक्ती विरोधात लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल करण्यात आला.

 

 

चिमुकली आजारी पडल्याने समोर आली अत्याचाराची घटना

माजलगाव शहरात एका  शाळेत बालवाडी आहे. त्यामध्ये परिसरातील लहान मुले मुली दररोज येतात या परिसरातीलच एक साडेपाच वर्षाची चिमुरडी नियमित शाळेत येते तिला शाळेतील एका अज्ञात इसमाने दि .२५ ते २८ सप्टेंबर रोजी डबा खाल्यानंतर अत्याचार केला. घटनेनंतर चिमुरडी  ताप येऊन आजारी पडली त्यामुळे तिला दवाखान्यात उपचार करण्यात आले.घरी आल्यावर तिने शाळेत झालेली ही गोष्ट आपल्या पालकांना सांगितली.

 

 

चिमुकली म्हणाली, 'त्या माणसाला मी ओळखते'

पांढरे कपडे घातलेला माणसाला मी ओळखते असे चिमुकलीने तिच्या आईवडिलांना सांगितले. या घटनेनंतर चिमुरडीच्या पालकांनी माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुरूवारी तक्रार दिली त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरुद्ध लैंगिक अत्याचार पोस्को गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी सदरील अल्पवयीन मुलीची अंबाजोगाई येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली होती. 

 

 

घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय अधिकारी धीरजकुमार बच्चू व पोलीस निरीक्षक राहुल सूर्यतळ यांचे सह पोलीस उपनिरीक्षक सुनील दिंडे यांनी सदरील शाळेची चौकशी करून तेथील सीसीटीव्ही ची तपासणी केली तसेच या शाळेतील सर्व शिक्षकांची ओळख परेड घेतली तसेच शिक्षकांच्या फोटोमधून सदरील चिमुरडीने आरोपी शिक्षकाचा फोटो पाहून त्याची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित शिक्षक राहुल अंबादास वायखिंडे (सध्या रा.माजलगाव, मूळ रा. ब्रह्मगाव ता.कोपरगाव जि.अहमदनगर) यास अटक केली आहे.

Advertisement

Advertisement