बीड दि. २७ (प्रतिनिधी ) : जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघाकडे सध्या राज्याच्या नजरा आहेत. राज्याचे कृषिमंत्री असलेले धनंजय मुंडे यांचा हा मतदारसंघ असून याठिकाणी स्वतः शरद पवार लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे येथील निवडणूक चुरशीची होणार आहे. या मतदारसंघात माजी मंत्री पंडितराव दौंड आणि माजी आ. संजय दौंड या कुटुंबाचा देखील मोठा राजकीय प्रभाव आहे , त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत संजय दौंड काय भूमिका घेतात याकडे सर्वांच्या नजरा आहेत .
बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघ हा सध्या राजकीयदृष्ट्या संवेदनशील मतदारसंघ म्हणून ओळखला जात आहे. मंत्री धनंजय मुंडे यांचा हा मतदारसंघ. सध्या सरकारमध्ये धनंजय मुंडे यांचे स्थान आणि भूमिका महत्वाची असल्याने या मतदारसंघाकडे स्वतः शरद पवारांनी लक्ष घातले आहे. एकीकडे महायुतीमुळे येथील परंपरागत प्रतिस्पर्धी असलेले राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र आले आहेत, तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांची त्यांच्याच मतदारसंघात कोंडी करण्यासाठी स्वतः शरद पवार रणनीती आखीत आहेत.
या साऱ्या घडामोडींमध्ये आता दौंड कुटुंबाची भूमिका महत्वाची राहणार आहे. पंडितराव दौंड हे राज्याचे माजीमंत्री होते. त्यांचे या मतदारसंघावर वर्चस्व राहिलेले आहे. अगदी दिवंगत गोपीनाथ मुंडेंपासून मुंडे आणि दौंड कुटुंब परस्परांचे राजकीय विरोधक राहिलेले आहेत. त्यातूनच मागच्या काळात शरद पवारांनी संजय दौंड यांना विधानपरिषदेवर संधी दिली होती. मात्र राष्ट्रवादीमधील फुटीच्या काळात संजय दौंड हे अजित पवार गटासोबत राहिले. आजघडीला ते जिल्ह्यात धनंजय मुंडे यांच्यासोबत असल्याचे मानले जाते. मात्र संजय दौंड यांची विधानपरिषदेवर पुन्हा येण्याची इच्छा लपून राहिलेली नाही. त्यासाठी त्यांनी पक्षात लॉबिंग सुरु केले आहे. मात्र राज्यपाल नियुक्त आमदारांचा विषय अजून तरी मिटलेला नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला यातील ३ आमदारपडे येणार आहेत, मात्र त्यासाठी पक्षात अनेक दावेदार आहेत. त्यातून संजय दौंड यांचे 'समाधान ' करणे धनंजय मुंडे यांना शक्य होईल का ? यावर परळी मतदारसंघाची बरीच राजकीय गणिते अवलंबून राहणार आहेत. पंडितराव दौंड आणि सध्या स्वतः संजय दौंड यांचा या मतदारसंघात तगडा संपर्क आहे. तसेच कोरोना काळात संजय दौंड यांनी झोकून देऊन केलेले काम ही त्यांच्यासाठी जमेची बाजू आहे. त्यामुळे उद्या या मतदारसंघात संजय दौंड यांनी एखादी भूमिका घेतली, तर त्या भूमिकेच्या बाजूने बऱ्यापैकी मतदान फिरू शकते अशी परिस्थिती आहे. आता या परिस्थितीत संजय दौंड नेमके काय करणार हे पाहणे महत्वाचे असेल.