Advertisement

जुगार खेळताना पोलीस आल्याचे समजताच इमारतीवरून मारली उडी;

प्रजापत्र | Friday, 27/09/2024
बातमी शेअर करा

पुणे : जुगाराची माहिती मिळाल्यानंतर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना पाहून दुसऱ्या मजल्यावरून उड्या मारत पळ काढत असताना एकाचा गंभीर जखमी होऊन मृत्यु झाल्याची घटना घडली. नाना पेठेत बुधवारी (दि. २५) हा प्रकार घडला असून, या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. यापूर्वी सिंहगड रोड परिसरात पोलिस कारवाईसाठी गेले असता इमारतीवरून उड्या मारून जात असताना एकाचा मृत्यु झाला होता. ब्रायन रुडॉल्फ गिअर (५२, रा. बाणेर) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

 

 

शहरात पोलिस आयुक्तांच्या आदेशानंतरही छुप्या पद्धतीने अवैध धंदे सुरू असल्याचे गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. दरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकांना नाना पेठेतील क्राईस्ट चर्चसमोर लाजवंती कॉम्प्लेक्स या ठिकाणी पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, युनिट एकचे वरिष्ठ अधिकारी तसेच त्यांचे पथक या ठिकाणी कारवाईसाठी गेले होते. तेव्हा दार बंद होते. त्यामुळे पोलिसांनी दरवाजा ठोठावला. एकाने दरवाजा उघडला; मात्र लोखंडी दरवाजा उघडला नाही. पोलिस समोर उभे असल्याचे दिसताच त्याने दार लावून घेत पोलिस आले, असा आवाज दिला व एकच गोंधळ उडाला. दरम्यान, फ्लॅट दुसऱ्या मजल्यावर होता. त्यामुळे चांगलीच तारांबळ उडाली होती.

फ्लॅटमध्ये असलेल्या व्यक्तींनी थेट खाली उड्या मारत पळून जाण्याचे प्रयत्न सुरू केले. काहींनी इमारतीच्या पाइपवरून तर काहींनी उड्या मारल्या. त्यात ब्रायन यांनी उडी मारल्यानंतर त्यांना गंभीर मार लागला. त्यांचा एक पाय फ्रॅक्चर झाला होता. त्यामुळे त्यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले. परंतु, मध्यरात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला.

 

 

ब्रायन यांच्यासोबत आणखी एक व्यक्तीदेखील जखमी झाल्याची माहिती आहे. परंतु, त्या व्यक्तीबाबत पोलिसांनी काहीही माहिती दिली नाही. त्यासोबतच पोलिसांना फ्लॅटमध्ये जुगाराचे साहित्य किंवा काहीच मिळाले नाही. तर, दुसरीकडे या फ्लॅटमध्ये नेमके किती लोक होते, हेही समजू शकले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी याच ठिकाणी पत्त्यांचा क्लब भरला जात होता. एका राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तीचा हा क्लब असल्याची माहिती मिळाल्याने पोलिस कारवाईसाठी गेले होते.

Advertisement

Advertisement