Advertisement

 प्रस्थापितांना धक्के देणारी 'परिवर्तनाची ' निवडणूक

प्रजापत्र | Thursday, 19/09/2024
बातमी शेअर करा

 बीड दि. १८ (प्रतिनिधी ) ; बीड जिल्ह्यात ज्या ज्या वेळी विधानसभेत शरद पवार यांच्या प्रभावाची चर्चा होते, त्या प्रत्येक वेळी हमखास आठवण निघते ती १९८० ची. विधानसभेच्या प्रत्येक प्रचारात शरद पवार बीड जिल्ह्यात येऊन '१९८० ची पुनरावृत्ती करा ' असे आवाहन करतातच. आणीबाणी , त्यानंतरची जनता राजवट  आणि पुन्हा सत्तेत आलेल्या इंदिरा गांधी या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राजकीय अस्तित्वाची म्हणून ज्या १९८० च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांकडे पहिले जात होते, त्या निवडणुकीत बीड जिल्ह्याने शरद पवारांच्या विचारांना साथ दिली होती. पाच आमदार शरद पवारांच्या पक्षाचे, एक अपक्ष, तर गोपीनाथ मुंडे यांच्या माध्यमातून भाजपचा एक असे आमदार निवडून आले होते आणि इंदिरा काँग्रेसच्या या जिल्ह्यात सुपडा साफ झाला होता. यातून अनेक प्रस्थापितांना धक्के बसले होते.
१९८० ची महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक विविध अर्थानी महत्वाची होती. त्याला कारण होते ते त्या अगोदर  देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात घडलेल्या काही घडामोडी. १९७५ ला इंदिरा गांधींनी लावलेली आणीबाणी १९७७ ला उठविण्यात आली . आणीबाणीच्या काळात महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार हे (रेड्डी काँग्रेस )  आणिबाणीविरोधक म्हणून ओळखले जायचे. १९७८ ला विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्यात इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस यांना राजकीय अपरिहार्यता म्हणून एकत्र यावे लागले. रेड्डी काँग्रेसचे वसंतदादा पाटील मुख्यमंत्री तर इंदिरा काँग्रेसचे नासिकराव तिरपुडे उपमुख्यमंत्री झाले. मात्र हे सरकार फारकाळ टिकले नाही. आणि पुलोदचा प्रयोग करून शरद पवार मुख्यमंत्री झाले. यात यशवंतरावांची किती सहमती, किती असहमती हे आता इतिहासजमा झाले आहे , पण शरद पवारांच्या या पुलोद सरकारमध्ये बीड जिल्ह्यातील माजलगावचे सुंदरराव सोळंके हे उपमुख्यमंत्री होते . मात्र केंद्रातील जनता सरकार कोसळले आणि नंतरच्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधी सत्तेत आल्या. सत्तेत येताच त्यांनी महाराष्ट्रातील पवारांचे सरकार बरखास्त केले. त्यावेळी पवारांचे बहुतांश साथीदार इंदिरा काँग्रेसमध्ये गेले. यात बीड जिल्ह्यातील क्षीरसागर , कदम, पंडित , आडसकर आणि अगदी शरद पवारांसोबत उपमुख्यमंत्री राहिलेल्या सुंदरराव सोळंके यांचाही समावेश होता. त्यामुळेच मग १९८० ची विधानसभा निवडणूक शरद पवारांनी प्रतिष्ठेची केली होती.
बीड जिल्ह्यात त्यांनी अगदी हेरून आणि सामाजिक संकीकरणांचा, अंतर्गत गटबाजीचा अभ्यास करून उमेदवारी दली. १९७८- ८० या काळात त्यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा ठराव मंजूर करून घेतला होता, त्यामुळे आंबेडकरी विचारधारा शरद पवार यांच्यासोबत होती. त्याशिवाय इतर सामाजिक गणिते जुळवित शरद पवारांनी आखणी केली आणि बीड जिल्ह्यात धक्कादायक निकाल लागले. चौसाळा मतदारसंघातून जयदत्त क्षीरसागर यांचा पराभव करीत चांदमल लोढा आमदार झाले. तर माजलगावात गोविंदराव डक तसे नवखे आणि बाहेरचे असतानाही त्यांनी सुंदरराव सोळंके यांचा पराभव केला. (सुंदरराव सोळंके यांनी आपल्या उपमुख्यमंत्रीपदाच्या काळात माजलगाव धरणासाठी प्रयत्न केले होते, त्या धरणात एक प्रार्थनास्थळ जात होत , त्याची देखील राजकीय किंमत सुंदरराव सोळंके यांना चुकवावी लागली आणि कदाचित त्यामुळेच या पराभवानंतर ते सक्रिय राजकारणातून बाजूलाच झाले. ). गेवराईत शिवाजीराव पंडितांचा पराभव करून माधवराव पवार (विद्यमान आमदार लक्षमण पवार यांचे वडील आणि माजी आ. शाहूराव पवार यांचे पुत्र ) आमदार झाले. तर बीडमध्ये राज्यमंत्री राहिलेल्या श्रीपतराव कदम यांचा तुलनेने नवखे असलेल्या राजेंद्र जगतापांनी पराभव केला. केज मतदारसंघ राखीव झालेला होताच. या ठिकाणाहून शरद पवारांच्या पक्षाचे गंगाधर स्वामी आमदार झाले. तर आजचा परळी आणि तेव्हाच रेणापूर मतदारसंघातून नव्यानेच स्थापन झालेल्या भाजपच्या चिन्हावर गोपीनाथ मुंडे यांनी बाबुराव आडसकर यांचा पराभव करून विधिमंडळात प्रवेश केला. एकूण काय तर या जिल्ह्यात इंदिरा काँग्रेसचा सुपडा साफ झाला. म्हणूनच आजही शरद पवार बीड जिल्ह्यात येऊन १९८० ची पुनरावृत्ती करण्याचे आवाहन करीत असतात .

Advertisement

Advertisement