दिल्ली- शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी संजय गायकवाड यांच्याविरोधात दिल्लीत तक्रार करण्यात आली आहे. दिल्लीतल्या तुघलक रोड पोलीस ठाण्यात काँग्रेसने आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. केंद्रीय मंत्री रवनीत बिट्टू यांच्यासह संजय गायकवाड यांच्याविरोधात ही तक्रार दाखल झाली आहे. काँग्रेस नेते अजय माकन यांनी ही तक्रार दिली.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी परदेशात असताना आरक्षणासंदर्भात एक विधान केले होते. त्या वक्तव्यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी टीका केली होती. राहुल गांधी यांची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचे बक्षीस देणार असल्याचे विधान संजय गायकवाड यांनी केले होते. गायकवाड यांच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्याविरोधात टीका केली होती. त्यानंतर आता काँग्रेसने दिल्लीत आमदार गायकवाड यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष अजय माकन यांनी एनडीएच्या चार नेत्यांविरोधात दिल्लीच्या तुघलक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये आमदार संजय गायकवाड यांच्यासह दोन केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश आहे.