Advertisement

सरकारला शेवटची संधी - मनोज जरांगे

प्रजापत्र | Monday, 16/09/2024
बातमी शेअर करा

 जालना- "पुन्हा आमच्या नावानं बोंबलत बसायचं नाही. सरकारला आम्ही शेवटची संधी देत आहोत, जर आता मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर नंतर काहीही बोलून उपयोग नाही."; असा निर्वाणीचा इशारा सरकारला मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करत असलेले जरांगे यांनी आज रात्री पासून पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू करण्याची घोषणा केली आहे. जरांगे यांच्या या उपोषणामुळे सरकारवर तातडीने काही निर्णय घेण्याचा दबाव वाढला आहे.

 

जरांगे यांनी सरकारला स्पष्टपणे सांगितले की, आता त्यांना फक्त आश्वासनं नको आहेत, तर त्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्या लागतील. त्यांनी सरकारवर कठोर शब्दांत टीका करत, राज्यभरात मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिले जावे. यासाठी शिंदे समितीच्या नोंदी शोधण्याचे काम पुन्हा सुरू करावे. तसेच, आंदोलकांवरील सर्व गुन्हे माफ करण्यात यावेत, अशा मागण्या केल्या. 

 

जरांगे पाटील भाजपच्या मराठा नेत्यांनाही इशारा दिला की, "जर आरक्षण दिलं नाही, तर देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले जाईल. मराठा समाजाने राजकारणाचा भाग न होता आपले ध्येय साध्य करण्यावर लक्ष केंद्रित करावे." जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर तीव्र शब्दांत टीका केली. त्यांनी म्हटले की, भुजबळ वयाच्या अखेरीस चुकीचे काम करत आहेत. त्यांनी धनगर समाजाला सांगितले की, "तुमच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही. छगन भुजबळ यांच्या भडकावण्याला बळी पडू नका." आम्हाला राजकारणात जायचे नाही, मात्र समाजाच्या हक्कांसाठी त्यांनी हा लढा उभारला आहे, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.

 

 

सरकारला अखेरचा इशारा अन् हे शेवटचे उपोषण
जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास भविष्यातील सर्व घटनांना सरकार जबाबदार असेल. "रात्री १२ किंवा १ वाजता आमरण उपोषण सुरु करत आहोत. हे शेवटचे आंदोलन असेल, आणि नंतर आमच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर तुम्हाला बोंबलत बसावं लागेल," असे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

Advertisement