मराठवाड्याप्रमाणेच राज्यभरात गतवर्षापेक्षा पावसाची चांगली परिस्थिती आहे. बीड जिल्ह्यात पावसाने लावलेली हजेरी शेतकऱ्यांसाठी दिलासायदायक बाब आहे. याशिवाय धरणातील पाणीसाठ्यात झालेली लक्षणीय वाढ पाणीबाणी परिस्थितीला दूर नेणारी ठरते. मागच्या वर्षी राज्यातील मोठ्या धरणांत ७३.८७ टक्के पाणी आजघडीला होते तेच यावर्षी ९३.१८ टक्क्यांवर गेले आहे. यावरून यंदा राज्याला निसर्गाने भरभरून दिल्याचा अंदाज येतो. सध्या विधानसभा निवडणुकांचा माहोल सुरु होत आहे. निसर्गाच्या कृपा-अवकृपेचा थेट परिणाम सत्ताधार्यांच्या कामगिरीवर होत असतो. निसर्गाने अवकृपा केली, तर सरकार मदत करीत नाही म्हणून सरकार सार्वत्रिक रोषाचे धनी ठरते. ती वेळ आता येणार नाही.ज्या जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली, तेथे जाऊन विरोधकांनी शेतकर्यांची सहानुभूती मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
सप्टेंबरमधील पावसाने मराठवाड्यातील धरणे तुडुंब भरली आहेत. नगर, नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणे भरली आणि मोठ्या प्रमाणावर पाणी सोडावे लागले. त्यामुळे जायकवाडी हे मुख्य धरण सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण भरले आणि त्यातून गोदापात्रात मराठवाड्याच्या अन्य ४ जिल्ह्यांसाठी पाणी सोडता आले. परिणामी, या धरणावर अवलंबून असलेली मध्यम धरणे, बंधारेही पूर्ण भरले. वास्तविक, जायकवाडीत जूनच्या सुरुवातीला अवघे ४-५ टक्के पाणी होते. जुलै उलटून गेल्यानंतरही टक्केवारी पुढे सरकली नाही. त्यामुळे अख्खा मराठवाडा चिंतेच्या सावटात होता.पण ऑगस्टमध्ये वरच्या धरणातील पाण्याची आवक सुरू झाल्यामुळे हे धरण सप्टेंबरच्या सुरुवातीलाच ९५ टक्क्यांपर्यंत भरले. मराठवाडा हा राज्यातील सर्वांत दुष्काळी भाग. येथील पावसाची सरासरीच मुळात कमी. राज्याची सरासरी ८८३.३ मि.मी., तर मराठवाड्याची ४४२ ते ६८५. त्यातही कमी पाऊस पडला की, पुढील जूनपर्यंत शेतीसाठीच नाही, तर पिण्याच्या पाण्याच्याही टंचाईचा सामना आठही जिल्ह्यांना करावा लागतो. मराठवाड्यातील अवर्षणाच्या परंपरेमुळे राज्याच्या अन्य विभागांच्या तुलनेत धरणेही जास्त आहेत. या विभागात मोठी ४४, मध्यम ८१, तर लघू ७९५ धरणे आहेत. पाऊसमान बरे असेल, तर त्यांचे तळ झाकले जातात अन्यथा सर्वाधिक धरणे असूनही सर्व जिल्ह्यांत ठणठणाट. डिसेंबर येता-येता टँकरची मागणी सुरू होते आणि जूनअखेरपर्यंत पिण्याच्या पाण्याचा हा एकमेव स्रोत उरतो. जूनमध्ये सुरू होणार्या खरीप हंगामापुरता जमिनीत ओलावा असला आणि पावसाने दगा दिला, तर वर्षातून एकच पीक घेता येते. रब्बी हंगामाचा शेतकर्यांना विचारही करता येत नाही. त्यामुळे हरभरा, गहू या रब्बी पिकांच्या उत्पादनावरही परिणाम होतो. पावसाअभावी मराठवाड्यातील बाजारपेठाही वर्षभर सुस्तावस्थेत जातात आणि अर्थचक्र थांबते; पण पाऊस कमी पडला, तरी जायकवाडीत पाणी असेल, तर शेतकर्याला रब्बीची आशा असते. जायकवाडीतून छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे पाचही जिल्ह्यांची मदार याच धरणावर. पावसाळा सुरू होताच या धरणात किती पाणी साठले, यावर सर्वदूर चर्चा सुरू होते.
दरम्यान जायकवाडी भरल्यामुळे सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. ऑगस्ट अखेरीस ढगफुटीसारखा पाऊस पडल्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. राज्यातील एकूण २६ जिल्ह्यांना अतिवृष्टीचा फटका बसला. कापूस, मूग आणि सोयाबीनची पिके पाण्यात गेली, तरीही मराठवाडा आणि राज्याच्या अन्य भागांंत शेती बहरली आहे. मराठवाडा, विदर्भात कापूस, तूर, सूर्यफूल, तर कोकणात भातशेती जोमात आहे. अतिवृष्टी झालेल्या जिल्ह्यांमध्ये तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश आल्यामुळे हे कामही वेगात सुरू आहे. त्यामुळे दिवाळीपर्यंत भरपाई मिळेल, या आशेवर अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आहेत.