Advertisement

मुंडेंबद्दलच्या तक्रारींची थेट फडणवीसांकडूनच उपेक्षा  

प्रजापत्र | Monday, 16/09/2024
बातमी शेअर करा

बीड दि. १४ (प्रतिनिधी ) : 'आपण सत्तेत असूनही आपल्याला हवे तसे अधिकारी मिळत नाहीत , त्यामुळे आपण निवडणूक लढविणार नाही ' असे सांगून थेट धनंजय मुंडेंवर टीका करून भाजपचे आ. लक्षमण पवार यांनी काही काळासाठी खळबळ भलेही उडवून दिली असेल, मात्र आजच्या घडीला भाजपचे श्रेष्टी देखील धनंजय मुंडेंच्या विरोधात 'आपल्या ' लोकांचेही ऐकून घ्यायच्या मानसिकतेत नाहीत हेच यातून समोर आले आहे. यापूर्वी देखील आ. पवारांनी केलेल्या  तक्रारीची खुद्द देवेंद्र फडणवीसांकडून उपेक्षाच झाल्याचे चित्र आहे.
बीड जिल्ह्यात भाजपची शक्ती असली तरी जिल्ह्यावर सध्या प्रभाव आहे तो पालकमंत्री असलेल्या राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडेंचा . राज्यात महायुतीचे समीकरण जुळविण्यात आणि त्यातही त्या समीकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बेरीज करण्यात धनंजय मुंडेंची भूमिका किती महत्वाची होती हे आता लपून राहिलेले नाही. त्यामुळेच अगदी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी सुद्धा धनंजय मुंडे हे हक्काचा ' हातचा ' आहेत . धनंजय मुंडेंच्या माध्यमातून कधीही कोणतेही समीकरण जुळवित येते याची अगदी देवेंद्र फडणवीसांना देखील खात्री आहे, आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीस राजकीयदृष्ट्या धनंजय मुंडेंच्या प्रेमात आहेत.
त्यातूनच मग धनंजय मुंडेंच्या विरोधात आपल्या पक्षाच्या आमदारांनी केलेल्या तक्रारीला देखील फारसे महत्व देण्याची आवश्यकता फडणवीसांना कधी वाटली नाही. चार दिवसांपूर्वी आ. लक्षमण पवार यांनी भलेही आपल्या मनातली खदखद सार्वजनिक केली असेल, मात्र त्यांनी पक्षाच्या मंचावर यापूर्वी हे बोलून दाखविले. देवेंद्र फडणवीसांनी काही दिवसांपूर्वी म्हणे भाजपच्या आमदारांची बैठक सागर बंगल्यावर बोलावली होती. विषय होता वेगवेगळ्या आरक्षण आंदोलनांच्या परिणामांचा. त्या बैठकीत म्हणे आ. पवारांनी धनंजय मुंडेंबद्दल तक्रार करण्याचा प्रयत्न केला, पण 'व्यक्तिगत चर्चेची ही जागा नाही ' म्हणत फडणवीसांनी भाजपच्या आमदारांना 'जागा ' दाखविली आणि धनंजय मुंडेंचे 'स्थान ' देखील स्पष्ट केले. त्यानंतर देखील आ. पवारांच्या चार पाणी तक्रार पत्राला फारसा सन्मान देण्याचे औदार्य 'सागर ' बंगल्यावरून दाखविले गेले नाही असेही सांगतात. हे केवळ आ. पवारांच्याच बाबतीत आहे असे नाही, तर भाजपचे आमदार, नेते, पदाधिकारी काहीही म्हणोत, बीड जिल्ह्यात 'धनंजय मुंडे दाखवितील  तीच दिशा ' हेच धोरण खुद्द देवेंद्र फडणवीसांचेच आहे असे म्हणतात. मग भाजपच्या इतरांनी ओरडून तरी काय होणार ?

Advertisement

Advertisement