बीड दि.१४ (प्रतिनिधी)-पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी शुक्रवारी (दि.१३) २० बियर चालकांवर कारवाई करून २४ तास उलटत नाहीत तोच शनिवारी (दि.१४) बीडमध्ये दारू पिऊन गाड्या चालविणाऱ्या १९ जणांवर कारवाया करण्यात आल्या आहेत. सलग दोन दिवसांपासून बारगळ यांनी बीड शहरात केलेल्या कारवायांमुळे अवैध धंद्यांसोबतच नियमांचे उल्लंघन करणारांचे धाबे दणाणले आहेत.अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, वाहतूक शाखेचे प्रमुख सुभाष सानप यांच्यासह पोलीस निरीक्षक मारुती खेडकर, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ, पोलीस निरीक्षक अशोक मुदिराज यांचा या कारवाईत सहभाग होता.
शुक्रवारी रात्री बीड शहरातील २० बियर शॉपीवाल्यांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याची बाब पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांना समजल्यानंतर त्यांनी स्वतंत्र टीम तयार करून एकाच वेळी छापा मारण्याचे आदेश दिले.त्यानुसार २० बियर शॉपीमधून मद्यपींना त्याच ठिकाणी दारू पिण्यासाठी सुविधा उपल्बध करून देण्यात येत होती.त्यानुसार संबंधित चालकांवर बीड शहर,शिवाजी नगर आणि पेठ बीड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले.दरम्यान शुक्रवारी या कारवाया झाल्यानंतर शनिवारी रात्री बीडमध्ये दारू पिऊन वाहने चालविणाऱ्या १९ जणांवर एसपींकडून कारवायांचा बडगा उगारण्यात आला आहे.छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगर नाका, बार्शी नाका, महालक्ष्मी चौक, चऱ्हाटा फाट्यावर पोलिसांनी सापळा रचून या कारवाया केल्या आहेत. दरम्यान मागच्या दोन दिवसात अविनाश बारगळ यांनी बीडमध्ये केलेल्या कारवाया जिल्ह्यात चर्चेचा भाग ठरल्या आहेत.