अहमदनगर : सध्या पोलीस भरती आणि सैन्य भरतासाठी तरुणाई जिवाचं रान करुन प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे. सैन्य भरती निघाली की शक्य तिथं जाऊन शारिरीक चाचणी दिली जाते. तर, पोलीस भरतीसाठीही तरुणांनी असलेल्या स्पर्धा आपल्यासमोर आहे. विशेष म्हणजे या भरतींसाठी तरुणांनाकडून अगोदर विविध क्लासेस किंवा स्पर्धां परीक्षा प्रशिक्षण केंद्रांच्या माध्यमातून स्वत:ची तयारी केली जात असते. मात्र, बनावट प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या शेकडो युवकांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. त्यामध्ये, अहमदनगर जिल्ह्यातील १० ते १२ युवकांसह महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, उत्तर प्रदेश, बिहार,पंजाब, हरियाणा आणि नवी दिल्ली येथील शेकडो युवकांना लष्करात भरतीचे आमिष दाखवून फसविणाऱ्या रॅकेटचा अहमदनगर भिंगार पोलीस आणि दक्षिण कमान मिलीटरी इंटेलिजन्स पुणे यांनी कारवाई करत भांडाफोड केला आहे.
अहमदनगर पोलिसांनी बनावट सैन्य भरतीप्रकरणात सत्यजित भरत कांबळे या आरोपीला श्रीरामपूर तालुक्यातून अटक केली असून त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे. मी आणि माझे साथीदार लष्करात तसेच मिलिटरी इंजीनियरिंग सर्व्हिसेस येथे अधिकारी असून मी लष्करात तुमची भरती करून देतो, असं सांगत आरोपी सत्यजित कांबळे आणि त्याचे साथीदार अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र आणि इतर राज्यातील बेरोजगार सुशिक्षित तरुणांकडून प्रत्येकी ७ ते ८ लाख रुपये घ्यायचे. त्यानंतर, बनावट नियुक्ती पत्र आणि बनावट ओळखपत्र संबंधित तरुणांना दिले जायचे. एवढेच नव्हे तर कांबळे आणि त्याच्या साथीदारांनी महाराष्ट्राबाहेर ट्रेनिंग कँपदेखील उभारले होते.
महाराष्ट्राबाहेर सैन्य भरतीसाठी उभारण्यात आलेल्या बोगस ट्रेनिंग कँपमध्ये तरुणांना बोलावून त्यांना तीन ते चार दिवसाची ट्रेनींग देखील दिली जात होती. आरोपी कांबळे आणि त्याच्या साथीदाराने फक्त महाराष्ट्राच्या तरुणांसोबतच नव्हे तर कर्नाटक, तेलंगणा, उत्तर प्रदेश, बिहार,पंजाब, हरियाणा आणि नवी दिल्ली येथील शेकडो तरुणांसोबत ही फसवणूक केली आहे. आरोपींनी अशा तरुणांना कोट्यावधी रुपयांना गंडा घातल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. दरम्यान लष्कर भरती फसवणूकी संदर्भात नाशिक येथे राहणाऱ्या भगवान घुगे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी अहमदनगर येथील लष्कर हद्दीत असलेल्या भिंगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी याबाबत मिलिटरी इंटेलिजन्स पुणे यांना याबाबत माहिती दिली होती. त्यानुसार पोलीस आणि मिलीटरी इंटेलिजन्स यांनी आरोपी सत्यजित कांबळे याचा शोध घेतला. मात्र आरोपी कांबळे हा दिल्लीत असल्याची पोलिसांनी माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आणि आर्मी अधिकाऱ्यांनी थेट दिल्ली गाठली. पण, पोलीस पाठलाग करत असल्याचा सुगावा तेथे त्याला लागला आणि तो दिल्लीवरून महाराष्ट्रात परतला.