आरसा विधानसभेचा/ औसा
इलियास चौधरी
औसा दि. १३ :लोकसभा निवडणुकीत हातात मशाल धरून विजयाची तुतारी वाजविणाऱ्या आघाडीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटप व उमेदवारीवरून वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याला कारण म्हणजे माजी मंत्री अमित देशमुख यांनी औसा व निलंगा विधानसभेच्या दोन्हीही जागेवर दावा करीत शिवसेना उ.बा.ठा. गटाला मागच्या निवडणुकीतील काँग्रेसचा विजय दाखवत डोळ्यात अंजन घालण्याचे काम केले असून परवा लातूर येथे काँग्रेसच्या कार्यक्रमात वरील दोन्हीही जागेवर पारंपरिक कॉग्रेसच सरस असल्याचे सांगून तयारीला लागण्याचे सुतोवाच केले आहे.
दीड महिन्यावर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली असून सर्वच राजकीय पक्ष आपली दावेदारी सांगत असताना विविध सर्व्हे करून सक्षम उमेदवार कोण..? हा कल जनतेतून घेत आहेत.दरम्यान लोकसभा निवडणुकीतील निकालावरून आघाडीचे पारडे जड असले तरी औसाची जागा काँग्रेसचीच ही माजी मंत्री अमित देशमुखांची कडक भूमिका आघाडीत तणाव निर्माण करणारी असून शिवसेना गटाचे माजी आ. दिनकरराव माने व संतोष सोमवंशी हे दोघेही इच्छुक असून महाविकास आघाडीचा सक्षम उमेदवार कोण या करीता मतदार संघात कमालीची उत्सुकता लागली आहे. असे असले तरी माने व सोमवंशी यांना उमेदवारी न मिळाल्यास होणारी नाराजी भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांच्या पथ्यावर पडणार हे मात्र नक्की आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना औसा विधानसभेतून ३५ हजाराचे मताधिक्य मिळाले आणि आमदार अभिमन्यू पवार यांना जोरदार धक्का बसला आहे.औशाची जागा महाविकास आघाडी कडून शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मिळणार म्हणून संतोष सोमवंशी शिवसेनेकडून प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्याच बरोबर माजी आमदार दिनकर माने यांनीही आपला दावा सांगत तयारी सुरु केली आहे. शिवसेनेकडून संतोष सोमवंशी व माने यांनी उमेदवारी मिळण्या अगोदरच आपला प्रचार गाव भेटीतुन सुरु केला असताना काँग्रेसकडून ही लिंगायत समाजालाच उमेदवारी मिळणार असे ग्राह्य धरून काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. काँग्रेसकडून यावेळी मराठा उमेदवार म्हणून संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखाना चेअरमन शाम भोसले यांच्या उमेदवारी करीता काँग्रेस मधील मराठा गट दावेदारी करीत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.
सध्या औसा मतदारसंघात काँंग्रेस कडून केवळ उटगे हे कामाला लागले असून ऐन वेळी दबाव वाढल्यास मराठा उमेदवार म्हणून शाम भोसले यांच्या उमेदवारीची शक्यता नाकारता येत नाही. तसेच महिलांना उमेदवारी मिळावी म्हणून काँग्रेसकडून विद्या पाटील व शिवसेनेकडून जयश्री उटगे या मजबूत महिला उमेदवारांनीही दावा केला आहे.
--
आघाडीत उमेदवाराची फौज
लोकसभा निवडणुकीत आघाडीला मिळालेली लीड पाहता उमेदवार म्हणून इच्छुक असलेल्या सर्वांची नजर आपल्या उमेदवारी वर आहे शिवसेना पक्षातील दिनकरराव माने व संतोष सोमवंशी यांनी थेट पक्षाकडे दावा केला असला तरी काँग्रेस कडून अद्याप दावेदारी झाली नाही मात्र जिल्हाध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी तयारी सुरु केली आहे. पण मराठा समाजाचा मोठा गट यावेळी आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून माजी मंत्री दिलीपराव देशमुख व आ. अमित देशमुख यांच्याकडे मागच्या दाराने प्रयत्न करतोय अशी चर्चा असली तरी कोण कोण उमेदवार म्हूणन मागणी करतोय हे लवकरच कळणार आहे. असे असले तरी औसाचा उमेदवार देशमुख ठरवतील तोच पण आघाडीतील उमेदवारी करीता होत असलेली मोर्चे बांधणी जोरात सुरु आहे.
--
प्रजापत्र | Saturday, 14/09/2024
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा