भाजप, आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या धर्माच्या नावावर विद्वेष पसरविण्याच्या धोरणातील फोलपणा आणि त्यांचा खरा हेतू, भाजप, संघ परिवाराकडून कथित हिंदुत्वाबाबत पसरविले जाणारे फेक नेरेटिव्ह, याबद्दल अभ्यासपूर्ण आणि तात्विक तसेच वास्तवदर्शी मांडणी करणारे टीकाकार म्हणून सीताराम येचुरी ओळखले जायचे. त्यांच्या जाण्याने डाव्या पक्षातील एक बुद्धिप्रामाण्यवादी आवाज हरपला आहे.
ज्या ज्या वेळी रामाचा किंवा हिंदुत्वाचा मुद्दा समोर येतो, त्या त्या वेळी महात्मा गांधींपासून ते राम मनोहर लोहियांपर्यंतच्या अनेक नेत्यांनी रामाबद्दल किंवा हिंदुत्वाबद्दल दिलेल्या दाखल्यांचा आधार घेण्याचा लंगडा प्रयत्न नेहमीच संघ किंवा भाजप करीत आले आहेत. महात्मा गांधी असे म्हणायचे, लोहिया तसे म्हणायचे असे सांगून या विषयांवर काँग्रेसी आणि समाजवाद्यांची गोची करण्यासाठीचे जे फेक नेरेटिव्ह निर्माण करण्याचा प्रयत्न भाजप आणि संघ परिवारांकडून केला जायचा, त्याला डाव्या पक्षांमधून जे तितकेच तगडे उत्तर दिले जायचे, तो आवाज होता सीताराम येचुरींचा. “महात्मा गांधी किंवा राम मनोहर लोहिया यांनी रामाचा उल्लेख केला असला तरी तो राजकारणासाठी नव्हता. त्यामागे रामराज्य किंवा रामाची पूजा करणे हा उद्देश होता. भाजपकडून रामाचा नेहमी राजकीय फायद्यासाठीच वापर केला गेला. यामुळेच भाजपची मंडळी ‘जय श्रीराम’ असाच उल्लेख करतात. ते ‘जय सियाराम’ असे म्हणत नाहीत. भाजप किंवा रा. स्व. संघाचे हिंदूत्व हे नेहमीच उच्चवर्णीयांचे किंवा ब्राह्मण्यवादी राहिले आहे. त्यांच्या हिंदूत्वाचा सारा ढाचा हा मनुस्मृतीवर आधारित आहे. समाजाची रचना कशी असावी याचे स्वरूपही संघ परिवाराने मनुस्मृती नुसारच केले आहे. महिलांना कशी वागणूक दिली जाते हे त्याचेच उदाहरण आहे. खाप पंचायतींना अजूनही प्रोत्साहन दिले जाते. मनुस्मृतीला एक प्रकारे बळ देण्याचे कामच या सरकारने केले आहे. उच्चवर्णीयांचेच हित जपले जाते हे सुद्धा अनुभवास आले आहे. या शब्दात सीताराम येचुरी यांनी अनेकदा भाजप आणि संघाचा समाचार घेतला होता. डाव्या पक्षांमधील एक करारी असा भाजप आणि संघाचा टीकाकार म्हणूनच येचुरी कायम ओळखले जायचे.
संसदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर, विशेषत: कामगार, गरीब आणि मध्यमवर्गीयांचे अधिकार आणि समस्यांवर आवाज उचलला. त्यांची संसदेतील अनेक भाषणे गाजली. येचुरी कोणती भूमिका मांडतात याकडे फक्त डाव्या चळवळीतीलच नाही तर इतर पक्षाच्या नेत्यांना आणि राजकीय अभ्यासकांनाही कुतूहल असे. श्रमिक, कामगारांचे प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी त्यांनी संसद आणि रस्त्यावरची लढाई नेहमीच लढली. धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावर कायम भूमिका घेतली आणि संघ परिवाराच्या हिंदुत्ववादी विचारसरणीला नेहमी विरोध केला.
सीताराम येचुरी यांनी १९७४ साली स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया अर्थात एसएफआयमध्ये प्रवेश केला. एका वर्षातच ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य देखील झाले. १९७५ साली जेएनयूमध्ये असतानाच त्यांना आणीबाणीच्या काळात अटक झाली. सन १९७७-७८ मध्ये ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणूनही निवडून आले होते. प्रकाश करात यांच्यासह सीताराम येचुरी यांनी त्या काळात जेएनयूमधील डाव्या विचारप्रवाहाचं नेतृत्व केल्याचं मानलं जातं.१९८४ साली सीताराम येचुरी माकपच्या केंद्रीय समितीचे सदस्य झाले. पॉलिट ब्युरोमध्ये त्यांचा प्रवेश झाला. २०१५ साली ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव म्हणून नियुक्त झाले. या दरम्यान त्यांनी तब्बल १२ वर्षं राज्यसभेत खासदार म्हणून काम केले. डाव्या विचारसरणीशी असलेली एकनिष्ठता, त्या अनुषंगाने घेतलेल्या भूमिका आणि त्या भूमिकांसाठी वेळोवेळी राजकीय किंमत मोजण्याची तयारी या गुणांमुळे ते भारतीय डाव्या राजकारणातील एक महत्त्वाचा आवाज म्हणून समोर आले.
अशा या डाव्या चळवळीतील नेत्याचे निधन हे साहजिकच चळवळीचे मोठे नुकसान आहेच. माकपमध्ये वास्तवदर्शी भूमिका मांडत संघटनेला एक दिशा देण्यात ज्यांचा मोठा वाटा राहिला, असा आवाज हरवल्याचे दुःख मोठे आहेच, मात्र आज चळवळीमध्ये असे आवाज अधिक आक्रमक होण्याची वेळ आलेली असताना, हिंदुत्वाच्या मुद्द्यावर खोटे नाटे काहीही समोर आणून अगदी कशालाही हिंदुत्वाशी जोडण्याचा जो प्रयत्न भाजप करीत आहे, भाजपच्या त्या मानसिकतेला छेद देण्यासाठी सीताराम येचुरी यांची अधिक आवश्यकता होती.