Advertisement

 रिक्षाचालकाचे अश्लील कृत्य; अल्पवयीन विद्यार्थिनीने धावत्या रिक्षातून मारली उडी!

प्रजापत्र | Wednesday, 11/09/2024
बातमी शेअर करा

डोंबिवली : खासगी क्लासवरून सुटल्यानंतर रिक्षातून घरी परतताना रिक्षाचालकाने रिक्षात बसलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थीनीशी लगट करण्याचा प्रयत्न केला. रिक्षावाला आपल्याशी गैरवर्तन करत असल्याची जाणीव झाल्यावर विद्यार्थिनीने धावत्या रिक्षामधून बाहेर उडी मारून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतरही न थांबता सदर रिक्षावाल्याने या विद्यार्थीनीशी अश्लील कृत्य करण्याच्या हेतूने तिचा पाठलाग केला. तिला शिवागाळ करून धमकावले. गोपाळ मुदलियार असे या रिक्षाचालकाचे नाव असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

 

या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पूर्वेकडे राहणारी एक अल्पवयीन विद्यार्थिनी दररोज सकाळी खासगी क्लासला जाते. घरी येताना ती मिळेल त्या रिक्षाने घरी येते. सोमवारी ही विद्यार्थिनी घरी येण्यासाठी एका रिक्षात बसली. रिक्षा सुरू झाल्यानंतर काही वेळाने चालक गोपाळ या विद्यार्थिनीकडे तिचा मोबाईल क्रमांक मागू लागला. विद्यार्थिनीने त्यास नकार दिला. त्यानंतर गोपाळने तिची छेड काढण्यास सुरूवात केली. रिक्षावाला आपल्याशी गैरवर्तन करत असल्याचे पाहून विद्यार्थीनीने त्याला रिक्षा थांबविण्यास सांगितले. तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून गोपाळ याने रिक्षा आणखी वेगात चालवण्यास सुरुवात केली. रिक्षावाला आपले अपहरण करत असल्याची जाणीव झाल्यावर सदर विद्यार्थिनीने धाडस करून सुसाट धावत असलेल्या रिक्षामधून बाहेर उडी मारली.

 

 

या प्रयत्नात ती रस्त्यावर जोरात आदळली. तशाच परिस्थितीत उठून तिने घराच्या दिशेने पळ काढला. तरीही रिक्षावाल्याने पाठलाग करून शिवीगाळ करत तिला धमकावले. रिक्षावाल्याच्या तावडीतून सुटका करवून घेतलेल्या विद्यार्थिनीने घरी गेल्यानंतर हा सारा प्रकार आई-वडिलांना सांगितला. आईच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून रिक्षावाला गोपाळ मुदलियार याला रिक्षास्टँडवरून अटक केली.

Advertisement

Advertisement