पुण्यातील पोर्शे कार प्रकरण अद्याप विस्मृतीत गेलेले नाही. त्या प्रकरणात राष्ट्रवादीच्या एका आमदाराचा अप्रत्यक्ष सहभाग खुद्द पोलिसांनीच समोर आणलेला आहे. असे असताना आता नागपुरात भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या मुलाच्या भोवती बेदरकारपणे कार चालवून अनेकांचा बळी घेतल्याचे वादळ घोंगावत आहे. पुणे काय किंवा नागपूर काय? पुढार्यांचे आणि बड्या धेंडांचे दिवटे कायद्याची आणि माणुसकीचीही सरेआम कत्तल करत असताना त्यांना आवरायचे तरी कोणी?
राज्याचे गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांच्या स्वत:च्या जिल्ह्यात बेदरकारपणे कार चालवून अनेकांचे बळी घेण्याचा प्रकार समोर येतो. कार अर्थातच अलिशान असल्याने या सार्या प्रकाराचे खापर त्या कारच्या चालकावर फोडले जाते. गुन्हा देखील चालकावरच दाखल होतो. प्रत्यक्षात मात्र ती कार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा दिवट्या चालवत असल्याचे सांगितले जात आहे. अर्थातच जिथे बड्या उद्योगपतीच्या लेकराला वाचविण्यासाठी सुध्दा सारी व्यवस्था कशी कंबरेतून कुर्निसात करत असते हे पोर्शे कार प्रकरणात सार्या राज्याने पाहीले आहेच. पुण्यातील ससून सारख्या रूग्णालयाची व्यवस्था देखील किती सडली आहे हे देखील या निमित्ताने अनुभवास आले होतेच. पुण्याच्या पोर्शे कार प्रकरणाचा तपास करणारे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी आता या प्रकरणात आरोपींना राष्ट्रवादीचे आमदार टिंगरे यांचे अप्रत्यक्ष पाठबळ असल्याचे देखील जाहीर करून सत्ताधार्यांची गोची केली आहेच. जिथे एखाद्या बड्या उद्योगपतीसाठी सारी व्यवस्था काहीही करायला तयार असते. तिथे सत्तेतील पक्षाच्या मोठ्या पदाधिकार्याच्या कुटुंबातील व्यक्तीच आरोपीच्या पिंजर्यात जाणार असेल तर त्याला वाचविण्यासाठी काय काय केले जाणार नाही?
नागपूरच्या कार प्रकरणात बावनकुळेंचा दिवट्या असल्याचे समोर आल्यानंतर अजून तरी या प्रकरणात स्वत:ला कर्तव्यदक्ष म्हणविणार्या राज्याच्या गृहमंत्र्यांनी कुठली प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र ते फार काही वेगळे बोलतील हे अपेक्षितही नाही. कायदा कायद्याचे काम करील, कोणावरही अन्याय होणार नाही असले काही बोलून हा विषय संपविण्याचा प्रयत्न होईल. पण मुळातच उद्योगपती काय, किंवा राजकीय पुढारी काय? यांच्या दिवट्यांनी काहीही करावे. त्यांना संरक्षण देण्यासाठी सारी व्यवस्था लोटांगण घालायला तयार असते. हा जो संदेश मागच्या काही काळात सातत्याने गेला आहे. त्याचे काय हा प्रश्न महत्वाचा आहेच.
म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावला जाऊ नये असे काही सांगितले जात असते. बेदरकारपणे वाहन चालवून अपघात घडविण्याच्या प्रकरणात देखील मागच्या काही वर्षात अगदी गल्लीपासून दिल्लीपर्यंत सातत्याने हेच होत आहे. मध्यंतरी एका केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या मुलाच्या वाहनातून असाच प्रकार घडला होता. त्यावर पांघरूण घालण्यासाठी देखील सार्या यंत्रणा सज्ज होत्या. कधी सिने कलाकार, कधी कोणत्या पुढार्याचे चिरंजीव तर कधी आणखी कोणत्या बड्या बापाची लेकरं. सत्तेच्या गुर्मित कधी नशेच्या आहारी जाऊन तर कधी आणखी कोणत्या कारणांनी रस्त्यावर वाहतुकीचे नियम सरेआम पायंदळी तुडवित असतात. त्यांच्या मस्तीमुळे बळी जातात, ते मात्र सामान्यांचे. हे टाळण्यासाठी कोणतेच सरकार काही ठोस भूमिका घेताना दिसत नाही. अशा काही घटना घडल्या की चार दिवस त्याची चर्चा होते. नंतर पुन्हा तो विषय थंड्या बस्त्यात जातो. पुन्हा एखादा असाच अपघात घडला की वर्तमानपत्राचे रकाने भरले जातात. काही काळासाठी माध्यमांवर हा विषय चर्चेचा होतो. आणि पुन्हा सारे काही थंड होते. हे थांबविण्यासाठी कठोर उपाययोजनांची राजकीय इच्छाशक्ती किमान महाराष्ट्र तरी दाखविणार आहे का?