Advertisement

भाजपच्या गटबाजीने काँग्रेसला अच्छे दिन ! लातूर शहर मतदारसंघातून आ. देशमुखांना कोण देणार टक्कर

प्रजापत्र | Wednesday, 11/09/2024
बातमी शेअर करा

आरसा विधानसभेचा / लातूर शहर
 सुजीत नाईक
लातूर दि. १०  : लातूर शहर विधानसभा मतदारसंघावर १९९५चा अपवाद वगळता काँगे्रसने नेहमीच वर्चस्व ठेवले आहे. मात्र, गेल्या काही वर्षापासून लातूर शहर मतदारसंघात भाजपची ताकद वाढली असून आ. अमित देशमुखांना पराभूत करणे सहज शक्य होवू शकते. मात्र, भाजपच्या अंतर्गत गटबाजीने आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अच्छे दिन राहतील असे चित्र दिसून येत आहे. भाजपाकडून विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी इच्छूकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आ. अमित देशमुखांच्या विरोधात भाजपाकडून कोण टक्कर देणार याकडे लक्ष लागले आहे.
विधानसभा मतदारसंघाची पुर्नरचना झाल्यानंतर लातूर शहर आणि लातूर ग्रामीण हे मतदारसंघ नव्याने अस्तित्वात आले. लातूर म्हटले की लोकनेते स्व. विलासराव देशमुख यांच्या नावाची चर्चा निश्चितच होते. केंद्रीय मंत्रीपदासह राज्याचे मुख्यमंत्रीपद सांभाळणाºया स्व. विलासराव देशमुख यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात विविध खात्याची जबाबदारीही सांभाळली होती. त्यांचाच राजकीय वारसा पुढे चालविण्याचे काम त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव आ. अमित देशमुख करीत आहेत. २००९ - २०१४ आणि २०१९ या तिन्ही विधानसभा निवडणुकीत त्यांनी सलग विजय मिळविला आहे. मात्र, प्रत्येक विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मताधिक्यात घट झाल्याचे पाहण्यास मिळाले आहे. लातूर शहर काँग्रेसचा बालेकिल्ला असला तरी या बालेकिल्लयाला सुरुंग लावण्याचे काम भाजपने २०१७ महापालिकेच्या निवडणुकीत केले होते. थेट झिरो टू हिरो अशी कामगिरी करीत भाजपने महानगरपालिकेत बहुमत मिळविलेहोते. या वर्षापासूनच लातूर शहरात भाजपची ताकद वाढत गेली आहे. घर मोठे झाले की घरातील मतभेदही वाढत जातात. अशीच काहीशी परिस्थिती सध्या भाजपाच्या गोटात आहे. वास्तविक भाजपची वाढलेली ताकद देशमुखांच्या पराभवासाठी पुरेशी आहे. मात्र, आ. अमित देशमुख यांची  रणनिती आणि भाजपातील अंतर्गत गटबाजी यामुळे गतनिवडणुकीत आ. देशमुखांचा विजय शक्य झाला होता.
आगामी होऊ घातलेली विधानसभा निवडणूक आ. अमित देशमुख यांच्यासाठी निश्चितच सोपी नाही. भाजपात अनेक दिग्गज असून यामध्ये आता माजी राज्यपाल तथा माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या स्रुषा डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांचाही समावेश झाला आहे. त्यांच्यासोबत अजित पाटील कव्हेकर, देविदास काळे, गुरुनाथ मगे, प्रेरणा होनराव, प्रदीप मोरे व लालासाहेब देशमुख ही नेतेमंडळी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक आहेत. या इच्छूकांनी आपापल्या परीने आपापल्या राजकीय गॉडफादरकडे फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर डॉ. अर्चना पाटील चाकूरकर व अजित पाटील कव्हेकर यांनी निवडणूकीच्या दृष्टीकोनातून संपर्क अभियानही सुरू केलेले आहे. या दोघांनी सुरु केलेल्या संपर्क अभियानात भाजपच्या इतर इच्छूकांचा किंवा नेते व पदाधिकाºयांचा सहभाग दिसून येत नाही. किंबहूना त्यांच्याकडून या दोघांच्या विरोध कुरघोडी करण्याचा प्रयत्नही करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. वास्तविक भाजपची लातूर शहरातील ताकद बघता आणि त्यांची एकजूट झाल्यास आगामी विधानसभा निवडणूक आ. अमित देशमुख यांचा पराभव करणे सहज शक्य आहे. मात्र भाजपातील अंतर्गत गटबाजी ही आ. अमित देशमुखांच्या पथ्यावर पडण्याची दाट शक्यता आहे. गटा-तटात विखुरलेली भाजपाची ताकद एकत्रित करण्यासाठी राज्य पातळीवरूनच हालचाली होणे अपेक्षित आहे. तसे झाले तरच भाजपा या निवडणूकीत ताकदीने उतरू शकणार आहे. अन्यथा पुन्हा एकदा लातूर शहर मतदारसंघातून काँग्रेसला अच्छे दिन असतील, असे राजकीय तज्ज्ञांकडून बोलले जात आहे.

Advertisement

Advertisement