Advertisement

जरांगे यांच्या आशीर्वादासाठी पुढाऱ्यांचे 'घालीन लोटांगण '

प्रजापत्र | Wednesday, 11/09/2024
बातमी शेअर करा

 बीड दि. १० (प्रतिनिधी ) ; लोकसभा निवडणुकीत झालेली जरांगे फॅक्टरची चर्चा आणि आता विधानसभेतही या फॅक्टर प्रभावी राहण्याची चिन्हे, यामुळे सध्या विविध पक्षातील पुढारी मनोज जरांगे यांच्यासमोर चक्क 'घालीन लोटांगण 'च्या भूमिकेत असल्याचे चित्र आहे. जरांगे यांच्या घोंगडी बैठका ठिकठिकाणी सुरु असून या बैठकांदरम्यां अनेकजण अगदी आपल्या वयाचा देखील विचार न करता चक्क मनोज जरांगे यांच्या पायावर लिन होत आहेत . हा एका निरपेक्ष आंदोलनाचा विजय म्हणता येईलही कदाचित , पण अशा 'लोटांगणातून ' खरोखर त्या पुढाऱ्यांना मनोज जरांगे यांचा आशीर्वाद मिळणार आहे का ?
राज्यात, विशेषतः मराठवाड्यात मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या करिष्म्याची आणि प्रभावाची चर्चा जोरात आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या इशाऱ्यावर काही ठिकाणी पाडापाडी झाली तर काही ठिकाणी मामांना दिल्ली पाहायला मिळाली. आता विधानसभा निवडणुकीत त्यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही, मात्र जरांगे यांचा आशीर्वाद आपल्यालाच मिळावा यासाठी प्रत्येक मतदारसंघात पुढाऱ्यांची धावाधाव होताना दिसत आहे.
मनोज जिरंगे सध्या राज्यभर घोंगडी बैठका घेत आहेत. या बैठकांच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा विषय जिवंत ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र आमदारकीचे वेध लागलेल्या विविध पक्षातील पुढाऱ्यांना मनोज जरांगे यांचा हा दौरा स्वतःच्या राजकारणाला संजीवनी वाटत आहे.  या दौऱ्याच्या निमित्ताने आपण मनोज जरांगे यांच्या नजरेसमोर राहिले पाहिजे यासाठी पुढाऱ्यांची धडपड एकवेळ समजू शकते, त्यासाठीची बॅनरबाजी आणि त्यावरील स्वतःची नावे, काहींचे फोटो देखील राजकारणाची 'अपरिहार्यता ' म्हणून समजून घेता येतील, मात्र अनेकजण या दौऱ्यात चक्क 'घालीन लोटांगण ' च्या भूमिकेत आहेत. मनोज जरांगे यांनी आपले आंदोलन आतापर्यंत निरपेक्ष ठेवले आहे, त्यामुळे त्यांची मराठा समाजातील सामाजिक उंची अगदी आभाळाएव्हढी वाटावी अशी झाली आहे हे नाकारता य्रेणार नाही, पण तरीही अनेक पक्षातील पुढारी आपल्या वयाचा विचार न करता 'घालीन लोटांगण ' करणार असतील तर खुद्द मनोज जरांगे यांना देखील ते ओंगळवाणे वाटणारच . कोणी मंत्रिमंडळ गाजविलेले, तर कोणी वेगवेगळ्या सभागृहात काम केलेले, कोणी वयाने ज्येष्ठ तर कोणाचा दबदबा मोठा , असे नेते केवळ निवडणुकीतील आशीर्वादासाठी जे काही करीत आहेत, ते सामान्य जनतेला पचणारे तर नाहीच , पण मनोज जरांगे यांनी ज्या भावनेतून हा लढा उभारला आहे, त्या भावनेला देखील हे सारे पटणारे नाही. त्यामुळे असे सारे करून पुढाऱ्यांना मनोज जरांगे यांचा आशीर्वाद मिळणार आहे का ?

Advertisement

Advertisement