Advertisement

जरांगेंचे टार्गेट तर भाजपातूनच पर्यायाचा शोध  

प्रजापत्र | Tuesday, 10/09/2024
बातमी शेअर करा

 बीड दि. ९ (प्रतिनिधी ) :राजकारणात कोणीच सत्तेचा अमरपट्टा घेऊन आलेला नसतो हेच खरे . राजकारणातील परिस्थिती कोणाच्या बाबतीत कधी आणि कशी बदलेल याचा काहीच नेम नाही. नाहीतर एकेकाळी राजकारणाच्या सारीपाटावर ज्या देवेंद्र फडणवीसांनी फेकलेली प्रत्येक 'सोंगटी' त्यांना इच्छित असेच दान द्यायची , त्याच देवेंद्र फडणवीसांचा प्रत्येक 'फासा ' सध्या उलट पडत आहे. एकीकडे भाषणे राज्यातील निवडणुकांमध्ये फडणविसांच्याच जोडीला नितीन गडकरींसह आणखी काही मातब्बर नेत्यांची फौज उतरविण्याचा निर्णय घेऊन त्यांना पर्याय शोधणे सुरु केले आहे तर दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे सध्या राज्याच्या सत्तेतील शिंदे आणि पवारांबद्दल एक शब्द देखील न बोलता केवळ देवेंद्र फडणवीसांनाच टार्गेट करीत आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांच्या खालोखाल डावपेचात कोणी असेल तर ते देवेंद्र फडणवीस यांनी . त्यांचे राजकीय डावपेच साधनशुचितेत  बसणारे होते असे म्हणायचे  धाडस स्वतः देवेंद्र फडणवीस देखील करणार नाहीत , मात्र मागची काही वर्षे राजकारणात त्यांना हवे तसे दान पडत होते. त्यांनी कोणत्याही सोंगटीला हात लावावा आणि हवे तसे हलवावे , डाव फडणवीसांचंच असे जणू राजकीय चित्र होते. त्याकाळात त्यांनी विरोधकांना तर दुखावलेच पण त्यांच्याच  पक्षातील फडणवीस पीडितांची यादी देखील छोटी नव्हती. त्यात पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, विनोद  तावडे आदी मातब्बर देखील होते,तर इतरांची गिनती करण्याचे कारणच नाही. २०१४ ते १९ पर्यंततर 'फडणवीस बोले आणि प्रदेश भाजप हले ' असेच चित्र होते. जणू काही महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हेच एकमेव राजकीय मल्ल आहेत असा त्यांचा अविर्भाव . पण राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणून शरद पवारांनी देवेंद्रांना 'तेल लावलेला पहेलवान ' काय असतो याची जाणीव करून दिली आणि खरेतर तेव्हापासूनच फडणवीसांचे फासे त्यांना साथ देईनात अशी अवस्था झाली.
आता तर महाराष्ट्राच्या राजकारणातील खलनायक म्हणून देवेंद्र फडणवीसांना रंगविले जात आहे. भाजपमध्ये देवेंद्र फडणवीसांना पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरु आहेतच. तसेतर अगओदरपासूनच, म्हणजे शिंदेंच्या सरकारमध्ये देवेंद्रांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायला लावूनच अमित शहा यांनी देवेंद्रांना 'जागा ' दाखविली होतीच. त्यात आता लोकसभा निवडणुकीतील राज्यातील पक्षाच्या  पराभवाची भर पडली आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवापासून धडा घेत पक्षाने महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात तब्बल २१ नेत्यांची फौज उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात नितीन गडकरींपासून पंकजा मुंडेंपर्यंत अनेक चेहरे आहेत. देवेंद्र फडणवीस हे त्यापैकी एक आहेतच , नाही असे नाही. मात्र या साऱ्यांच्या प्रयत्नाने जर राज्यात पुन्हा भाजपची सत्ता येणार असेलच, तर त्यावेळी देवेंद्र फडणवीस हा चेहरा असतीलच याची खात्री कोणी द्यावी ?
एकीकडे स्वतःच्या पक्षात असे तर दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे सातत्याने टार्गेट करीत आहेत ते देवेंद्र फडणवीस यांनाच. राज्याचे मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल जरांगे काही बोलतंय नाहीत , मात्र कोणताही कार्यक्रम, मग तो मेळावा असेल नाही तर सध्या सुरु असलेल्या घोंगडी बैठक, देवेंद्र फडणवीसांवर जहरी टीका केल्याशिवाय त्या पूर्णच होत नाहीत. जरांगे यांचे सध्याचे मराठा आरक्षण आंदोलन पूर्णत्वास जात नाही त्याचे खापर मनोज जरांगे फोडत आहेत ते एकट्या फडणवीसांवर . फडणवीसांचे ११३ आमदार पाडू असे जरांगे जिथे संधी मिळेल तेथून सांगत आहेत. मराठा समाजावरील अन्यायाला फडणवीस हेच कसे जबाबदार आहेत हे सांगण्यात जरांगे कोणतीच कसर सोडायला तयार नाहीत. त्यामुळे साऱ्या मराठा समाजात देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा खलनायकाची रंगविण्यात आलेली आहे. अशा परिस्थितीत एकट्या देवेंद्रांच्या नेतृत्वात निवडणुकीला सामोरे जाणायचे धाडस पक्षाने करायचे कसे आणि मग सामूहिक नेतृत्व होणार असेल फडणवीसांना इच्छित 'दान' पडावे कसे ?

Advertisement

Advertisement