Advertisement

मांजरा पट्ट्यात पुन्हा मॅनेज राजकारण ? आ. धिरज देशमुखांसमोर आव्हान कोणाचे  

प्रजापत्र | Monday, 09/09/2024
बातमी शेअर करा

सुजीत नाईक
लातूर दि. ०७  : मांजरा पट्ट्यात असलेल्या लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात आजपर्यंत काँग्रेसचेच वर्चस्व राहिले आहे. गतनिवडणुकीत शेवटच्या क्षणी हा मतदारसंघ भाजपाकडून शिवसेनेकडे गेला आणि धिरज देशमुख यांच्या आमदारकीची वाटचाल अतिशय सोपी झाली. अचानक हा मतदारसंघ शिवसेनेकडे जाण्याचे नेमके कारण काय ? याबाबत सर्वसामान्यांमध्ये अनेक चर्चा ऐकण्यास मिळाल्या होत. विशेषत: ही घडामोड मॅनेज राजकारण या दृष्टीनेच बघण्यात आली. त्यामुळे आगामी होणाºया निवडणुकीतही मांजरा पट्ट्यात पुन्हा मॅनेज राजकारण होणार का ?  आणि नाही झाले तर आ. धिरज देशमुखांसमोर आव्हान कोणाचे याकडे लक्ष लागले आहे.
लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात रेणापूर पूर्ण तालुक्याची ८५ गावे लातूर तालुक्यातील ९० व औसा तालुक्यातील २५ गावांचा समावेश आहे. मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर झालेल्या वर्ष २००९ च्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसचे वैजनाथ शिंदे , २०१४ च्या दुसºया निवडणुकीत काँग्रेसचे अ‍ॅड.त्र्यंबकनाना भिसे तर २०१९ च्या तिसºया निवडणुकीत काँग्रेसचे धिरज देशमुख विजयी झाले.
माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचा प्रभाव व देशमुख परिवाराची साखर कारखान्यावरील वर्चस्व यामुळे येथे काँग्रेसचे वर्चस्व आहे. मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसचे वैजनाथ शिंदे व भाजपचे रमेश कराड यांच्यात लढत झाली.
दुसºया निवडणुकीत वैजनाथ शिंदे यांनी प्रयत्न करूनही त्यांना डावलून त्र्यंबकनाना भिसे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. तर भाजपने रमेश कराड यांना परत मैदानात उतरवले. या निवडणुकीत कराडांचा निसटता झालेला पराभव भाजपच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला. परंतु राज्यात भाजपचे सरकार आल्यामुळे रमेश कराड यांनी पुन्हा जोरदार तयारी सुरु केली, कार्यकर्त्यांचे संघटन मजबूत करत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व तत्कालीन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून मोठी विकासकामे मतदारसंघात खेचून आणली. यामुळे सन २०१९ च्या निवडणुकीत कराड आमदार होणार अशी परिस्थिती झाली होती. परंतु एकही सरपंच नसलेल्या शिवसेनेला ही जागा सोडली अन् नवखा व अपरिचित उमेदवार दिल्यामुळे मतदारांत संभ्रम निर्माण झाला. हे राजकारण मॅनेज असल्याची भावना झाली.२०२० मध्ये रमेश कराड यांना विधानपरिषदेवर घेण्यात आले आहे. अर्थात जनतेतून निवडून येण्याची कराडांची प्रबळ इच्छा असल्यामुळे ते जोरदार तयारी करत आहेत. मात्र निवडणुकीत पुन्हा तडजोडीचे राजकारण होईल काय याची चर्चा मतदारसंघात आहे.
परिणामी भाजप कार्यकर्त्यांसह मतदारही संभ्रमात आहेत. आमदार धिरज देशमुख हे सतत मुंबईत असतात, हा मतदारसंघ ग्रामीण असल्यामुळे गोरगरीब लोकांना ते सहज उपलब्ध होत नाहीत, अशी चर्चा नागरिकांमध्ये असते. त्यामुळे त्यांची ओळख व्हीआयपी आमदार झाली आहे.काँग्रेसचे आमदार धीरज देशमुख यांना परत उमेदवारी देण्यात यावी असा एकमुखी ठराव काँग्रेसच्या बैठकीत नुकताच घेण्यात आला. त्यामुळे धीरज देशमुख यांची उमेदवारी निश्चितच मानली जात आहे. यामुळे आतापासूनच देशमुख यांनी तयारी सुरु केली आहे. विकासकामांच्या उद्‌घाटनाच्यानिमित्ताने त्यांनी रेणापूर तालुक्यात दौरे सुरु केले आहेत. काँग्रेसकडून देशमुखांची उमेदवारी निश्चित असून मनसेनेही जिल्हाप्रमुख संतोष नागरगोजे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. मात्र, नागरगोजे देशमुखांना टक्कर देवू शकत नाहीत अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मांजरा पट्ट्यात मॅनेज राजकारण होणार का ? आणि देशमुखांची वाट सुकर होणार का? याकडे लक्ष लागले आहे.

Advertisement

Advertisement