Advertisement

 शरद पवारांना सोडणं माझी चूक

प्रजापत्र | Saturday, 07/09/2024
बातमी शेअर करा

 मुंबई - शरद पवारांना सोडणं ही माझी चूक होती, अशी नाव न घेता जाहीर कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका जाहीर कार्यक्रमात दिली आहे. राज्याचे अन्न व प्रशासन मंत्री तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्माराव बाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम हलगेकर या लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. यापार्श्वभूमीवर अजित पवारांनी त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला.

"तुम्ही वडिलांसोबत राहा. वडिलांचं जेवढं लेकीवर प्रेम असतं तेवढं कोणीच करु शकत नाही. असं असताना तुम्ही कुठंतरी घरातच फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहात, हे बरोबर नाही. समाजाला हे आवडत नाही. आम्ही पण याचा अनुभव घेतलेला आहे, यातून मी माझी चूकही मान्य केली" अशा शब्दांत अजित पवारांनी अत्राम यांच्या कन्येला समजावण्याचा प्रयत्न केला.

 

 

अत्राम यांच्या कन्या शरद पवारांसोबत जाणार
गडचिरोली अहेरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि कॅबिनेट मंत्री धर्मारावबाबा आत्राम यांची कन्या भाग्यश्री आत्राम हलगेकर आणि त्यांचे पती ऋतुराज हलगेकर हे लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणखी एका राजकीय कुटुंबात त्यामुळं फूट पडणार असल्याचं चित्र आहे.

मुलीच्या या निर्णयानंतर धर्मारावबाबा आत्राम यांनी लेकीवर जोरदार टीका केली आहे. शरद पवारांच्या गटातील लोक माझं घरं फोडण्याचं काम करत आहेत. जी मुलगी माझी होऊ शकली नाही ती इतरांची काय होणार? मुलीला आपण प्राणहिता नदीत वाहून देऊ. एक मुलगी गेली तरी चालेल माझ्या मागे माझ्या घरातील सगळी फौज आहे, अशा कटू शब्दांत आत्राम यांनी मुलीच्या निर्णयावर भाष्य केलं आहे.

Advertisement

Advertisement