Advertisement

मुस्लिमांच्या मनातील खदखदीचा फटका कोणाला?

प्रजापत्र | Saturday, 07/09/2024
बातमी शेअर करा

 बीड दि. ६ : देशाने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला. देश आता प्रौढ झाला आहे. तरीही मुस्लिमांची आर्थिक, शैक्षणिक पिछेहाट कोणीही थांबवू शकले नाही. फक्त मुस्लिमांचा राजकारणासाठी वापर केला गेला. कॉंग्रेसने केवळ वोट बँक म्हणून वापर केला तर भाजपाने शिव्या देत त्यांच्या काही संस्थांच्या माध्यमातून संशयित वातावरण निर्माण करुन हिंदू वोट बँक आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला. मुस्लिमांनीही दगडापेक्षा विटकर मऊ म्हणत सेक्युलर समजल्या जाणाऱ्या पक्षांना मतदान करुन बळ दिले. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेतही काहीसं असं दिसून आलं. पण यानंतर घडलेल्या गाजापूर, नाशिक, रेल्वेतील मारहाण वृद्धाला मारहाण, अहमदनगर येथील नितेश राणेंची मस्जिद मध्ये घुसून मारण्याची धमकी पहाता मुस्लिमांमध्ये खदखद आहे. याचा फटका कोणाला बसणार? याची चर्चा सुरू आहे. तसे पहाता विधानसभा निवडणुकीत मुस्लीम मतदारांच्या निशाण्यावर पक्ष नव्हे तर जातीयवादी चेहरे असणार असे दिसून येत आहे.
मुस्लीम मतदार म्हटले की, निवडणुकीच्या सहा महिने आधी पासून चर्चेत येणारा भारतीय समाज. अनेक युक्त्या राबवून ज्यांना ओढून ताणून खलनायक म्हणून दाखवून संशयाला फेऱ्यात अडकलेला समाज म्हणता येईल. परंतु मुस्लीम या शब्दावर अनेकांची दुकाने चालतात. त्यात मुस्लीम म्हणून घेणारे आहेत. भाजपा कडून नेहमीच मुस्लिमांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न असतो. मुस्लिमांना बदनाम करुन हिंदू वोट बँक उभी करण्यात यशस्वी ठरले आहेत. परंतु २०१४ आणि २०१९ मध्ये मुस्लिंमानी विकासाच्या मुद्यावर भाजपाला स्वीकारले होते. परंतु त्यांचा तो केवळ जुमला ठरला असून, भाजपाचे काही चेहरे फक्त गरळ ओकत आहेत. यांना कोणी रोखतही नाही. तसेच भाजपाने मुस्लिमांना उमेदवारीतून बेदखल केल्याचे निवडणुकांमध्ये स्पष्ट झाले आहे. यामुळे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांनी युतीच्या विरोधात आघाडीला मतदान केले. याचा परिणाम म्हणून देशात आघाडीच्या जागांमध्ये कमालीची वाढ झाली. अन् भाजपाचे ४०० पार स्वप्न अपूर्ण राहिले. पण आघाडीनेही युतीच्या वाटेवर चालणे सुरू केले असून त्यांनीही मुस्लीम उमेदवारीला कात्री लावली आहे. तसेच ज्या मराठा समाजाला मोठा भाऊ मानून मुस्लिमांनी त्यांच्या शब्दावर अनेकांना मतदान केले. पण महाराष्ट्रातील एकमेव मुस्लीम खासदार असलेल्या इम्तियाज जलील यांना मात्र त्यांनी मतदान केले नाही. तो खासदार पाडला आहे. लोकसभा पार पडताच कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड अतिक्रमणाच्या अडून गाजापूर येथे हल्ला करुन मुस्लीम वस्तीला लक्ष्य करत मस्जिदची तोडफोड करण्यात आली. यामध्ये कॉंग्रेसचा खासदार सहभागी आहे. हा प्रकार थंड होत नाही तेच रामगिरी महाराज यांनी चुकिचे वक्तव्य करुन भावना दुखावल्या, एका वर्धाला रेल्वेत डब्यात काय आहे म्हणून मारहाण केली. यानंतर नितेश राणे यांनी तर चक्क मस्जिद मध्ये घुसून मारण्याची धमकी दिली. परंतु यावर सेक्युलर म्हणवून घेणारे शांत असून केवळ जितेंद्र आव्हाड यांनी न्यायाची भूमिका घेत दोषी विरोधात उघडपणे समोर आले. यामुळे आम्ही भारताचे नागरिक नाही का? देशाला इंग्रजांच्या तावडीतून सुटून ७८ वर्ष झालीतरी आम्हाला हेच सिद्ध का करावे लागते? यामुळे मुस्लिमांमध्ये खदखद आहे. ही खदखद मतदानाच्या रुपाने बाहेर पडते. यामुळे आता तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीत याचा कोणाला फटका बसणार हे येणारा काळच ठरवेल. परंतु विधानसभेत युतीच्या विरोधात उभा असलेला मुस्लीम विधानसभेत पक्षाच्या नव्हे तर जातीयवादी चेहऱ्याच्या विरोधात उभा रहील असे संकेत मिळत आहेत.

Advertisement

Advertisement