Advertisement

जयदत्त क्षीरसागर म्हणाले कामाला लागा, स्वतःची गावे सांभाळा

प्रजापत्र | Saturday, 07/09/2024
बातमी शेअर करा

 बीड दि. ६ (प्रतिनिधी ) : बीड विधानसभा मतदारसंघातून सध्या अनेकांनी मोर्चे बांधणी सुरु केली आहे, मात्र सर्वांचे लक्ष आहे ते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांकडे. जयदत्त क्षीरसागर निवडणूक तर लढणार, मात्र कोणत्या पक्षाकडून हे अजूनही गूढच आहे. आता याच संदर्भाने जयदत्त क्षीरसागरणनी आपल्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि त्यात कार्यकर्त्यांना 'पक्षाचा, चिन्हाचा विचार न करता कामाला लागा ' अशा सूचना केल्या आहेत. त्यासोबतच 'प्रत्येकाने आपले गाव सांभाळा ' असे सांगत कार्यकर्त्यांना निवडणुकीची 'त्रिसूत्री ' दिली आहे.
बीड विधानसभेवर अनेकवेळा वर्चस्व गाजविलेल्या जयदत्त क्षीरसागर यांच्याकडे सध्या सर्वांच्या नजरा आहेत. मागच्या निवडणुकीत स्वतःच्या पुतन्याकडूनच निसटता पराभव स्वीकाराव लागल्यानंतर जयदत्त क्षीरसागर मागच्या पाच वर्षात सर्वच राजकीय पक्षांपासून अंतर ठेवून आहेत . जयदत्त क्षीरसागर यांचे कार्यकर्ते आजही ' अण्णा हाच आपला पक्ष ' असे सांगत असतात.
त्याच जयदत्त क्षीरसागरानी शुक्रवारी आपल्या निवडक कार्यकर्त्यांचा एक मेळावा बीडमध्ये घेतला. प्रत्येक जिल्हापरिषद गटातील निवडक कार्यकर्ते, ग्रामपंचायतींचे पदाधिकारी आणि निवडणूक यंत्रणेतले कार्यकर्ते, असे निमंत्रित होते , तरी त्यांचाही आकडा हजाराच्या पुढे गेलाच. या कार्यकर्त्यांना जयदत्त क्षीरसागरानी कामाला लागण्याचा सहर्ष दिला आहे. मतदारसंघात आलो आहे, आपल्यासोबत संवाद होतोय, आपली भूमिका आपापल्या गावात सांगा , चिन्ह ,पक्ष याचा विचार करू नका , तुम्ही फक्त स्वतःचे गाव सांभाळा असे सांगत जयदत्त क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांना 'त्रिसूत्री ' दिली आहे.
 

 

काय आहे जयदत्त क्षीरसागरांची त्रिसूत्री ?
जयदत्त क्षीरसागरांनी आपल्या कार्यकर्त्यांना निवडणुकीची रणनीती म्हणून 'त्रिसूत्री ' दिली त्याची चर्चा सध्या जोरात आहे. मतदारांचे तीन गट तयार करा, तीन याद्या तयार करा. एक आपले हक्काचे मतदार , दुसरे बांधावरचे  मतदार आणि तिसरे आपले होणारच नाहीत असे मतदार असे काहीसे याद्यांचे स्वरूप असणार आहे. हक्काचे मतदार सांभाळायचे, बांधावरची आपलेसे करायचे आणि जे आपले होणारच नाहीत त्यांची समजूत काढण्याचे नियोजन शेवटच्या टप्प्यात करायचे असे काहीसे स्वरूप गावागावात असणार आहे.

Advertisement

Advertisement