राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड घडवून आणीत थेट थोरल्या पवारांच्या विरोधात स्वतःकडे लोक राहावेत म्हणून अनेक आश्वासने देणे ही त्यावेळची अजित पवारांची मजबुरी होती, त्य्यामुळे जो समोर येईल त्याला वाटेल ती आश्वासने दिली गेली. आता त्याची पूर्तता करायची तरी . एकतर अजित पवार गटाच्या वाट्याला सत्तेचा हिस्सा तसा फार येत नाही, आणि जो येत त्यात 'मागणारे ' अधिक, मग सर्वांना खुश ठेवायचे तरी कसे? अशावेळी धुसफूस तर होणारच .
विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी तीन जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्या आहेत. यासाठी महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर, माजी खासदार आनंद परांजपे आणि सिद्धार्थ कांबळे यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. दरम्यान, यावरून रुपाली ठोंबरे-पाटील यांनी रुपाली चाकणकर यांच्या संभाव्य उमेदवारीवरून नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वाद चव्हाट्यावर आला आहे. मुळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटामध्ये मागच्या काळात रुपाली चाकणकरांचे जे प्रस्थ वाढले, ते या पक्षातील जनतेत असलेल्या अनेक नेत्यांना मान्य नाही . पक्षाने कोणतीही पदे एकाच व्यक्तीला द्यावीत का यावरून आता थेट आरोप होऊ लागले आहेत.
अजित पवार गटाला विधानसभा निवडणुकांना सामोरे जायचे आहे. अशावेळी कार्यकर्ते आणि जनतेत स्थान असणारे नेते दुखावून पक्षाचे देखील भागणार नाही. अगोदरच महायुतीत असतानाही भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा जाहीर उपमर्द करीतच आहेत. जसे महाभारताच्या युद्धात कर्णाच्या सारथी होऊन शल्य कर्णाचा तेजोभंग करण्याचा प्रयत्न करीत होता, हे देखील तसेच काहीसे आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसमोरची आव्हाने वाढत आहेत. त्यातच आता राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीवरून पक्षातील वाद समोर येत आहेत. मुळात अजित पवार गटाच्या वाट्याला ३ आमदारक्या येणार आहेत, त्यात अजित पवार खुश तरी कोणाकोणाला करणार ? जी तीन नावे समोर आली त्यापेक्षा कितीतरी अधिक लोकांना शब्द दिलेत ते खुद्द अजित पवारांनी, त्या शब्दांचे करायचे काय हा आता प्रश्न आहेच. एकट्या बीड जिल्ह्यात अमरसिंह पंडित, संजय दौंड ,कल्याण आखाडे आदी सर्वांनाच आंदरकीचा शब्द होता , तो स्वतः अजित पवारांचा, आता या लोकांनी करायचे काय? यांना तर नाराजी व्यक्त देखील करता येत नाही .
आपले राजकीय करिअर पणाला लावून, थोरल्या पवारांचा राग सहन करत, ज्यांना अगदी काळ परवापर्यंत 'परमश्रद्धेय' वगैरे म्हणत होतोत, त्यांच्या विरोधात जाऊन इकडे देखील उपेक्षाच होणार असेल या साऱ्या राजकीय साहसाला अर्थ काय असे अजित पवार गटातील अनेकांना वाटणार असेल तर पक्षात धुसफूस तर होणारच. मग अजित पवार खुश तरी कोणाकोणाला करणार आहेत आणि कसे ?
बरे हे सारेहोत असताना, ज्यांना जनतेत फारसे स्थान नाही अशांनाच विधानपरिषद,सांगघटनात्मक पदे दिली जाणार असतील, तर सत्तेच्या जवळ राहता यावे या अपेक्षेने अजित पवारांसोबत आलेल्यांचे काय ? प्रत्येकवेळी संसदीय मंडळाचा निर्णय म्हणून भागणार तरी कसे ? राज्यसभेवर अजित पवार स्वतःच्या पत्नीला घेऊ शकतात, मग इतर नेत्यांनी काय करायचे ? प्रत्येकवेळी प्रत्येक पदासाठी रुपाली चाकणकरच कशासाठी, त्यांचा पक्षासाठी इतका त्याग आणि योगदान काय आहे असा प्रश्न जर पक्षातील इतर नेत्यांना पडणार असेल तर त्याचे उत्तर कधीतरी अजित पवारांना, सुनील तटकरेंना द्यावेच लागेल, तसे झाले नाही तर ही धुसफूस कोणत्या वळणावर जाईल हे सांगणे अवघड आहे.