Advertisement

प्रमुख पक्ष घेत आहेत चळवळींची दखल

प्रजापत्र | Friday, 06/09/2024
बातमी शेअर करा

शरद कदम
मुंबई  दि. ५    एकाच आठवड्यात तीन प्रमुख पक्षाच्या नेत्यांनी सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांशी संवाद साधला.लोकसभा निवडणुका नंतर सामाजिक चळवळीतील संस्था,संघटना यांच्या कामाची दखल महाराष्ट्रातील प्रमुख पक्षाचे नेते घेवू लागले आहेत ही चळवळीच्या दृष्टीने चांगली गोष्ट घडत आहे.मात्र निवडणुकीचे निकाल आल्यानंतरही असा ' संवाद ' महाविकास आघाडीच्या नेत्यांनी  ठेवला पाहिजे असं कार्यकर्ते म्हणत होते.
लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे 48 पैकी  30  आणि सांगलीचे एक अपक्ष खासदार निवडून आल्याने महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत  इंडिया आघाडीच्या तीन प्रमुख पक्षामध्ये उत्साही वातावरण आहे.प्रमुख पक्षाच्या सोबतच महाराष्ट्रातील विविध सामाजिक. संस्था,संघटनाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू आहेत.निवेदने दिली जात आहेत.लोकसभा निवडणुकीत या सर्व पुरोगामी संस्था,संघटनाच्या मदतीने महाविकास आघाडीला यश मिळालं त्याची जाणीव शिवसेनेचे उध्वव ठाकरे,काँग्रेसचे नाना पटोले आणि राष्ट्रवादीचे शरद पवार या नेत्यांना  आहे.जाहीरपणे या सर्व नेत्यांनी सामाजिक संघटनांचा तसा उल्लेखही  केलेला आहे.
  काँग्रेसने गेल्या आठवड्यात शनिवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी मुंबईतील टिळक भवनात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जाहीरनामा संबंधी चर्चा करण्यासाठी सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांना बोलावले होते.गेली अनेक वर्ष सामाजिक चळवळीतील ही माणसं आदिवासी,महिला,शेतकरी, विद्यार्थी या प्रश्नांवर काम करीत आहेत.त्यांची मदत घेवून उद्याच्या महाराष्ट्राचे चित्र जाहीरनाम्यातून मांडण्यासाठी ही बैठक बोलावली होती.काँग्रेसच्या महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांनी सामाजिक संस्थांना बोलावण्यासाठी पुढाकार घेतला होता. प्रा.डॉ.भालचंद्र मुणगेकर,माजी मंत्री सुरेश शेट्टी,विरोधी पक्ष नेता विजय वडवट्टीवार आणि नितीन राऊत हे काँग्रेसच्या जाहीरनामा समितीचे प्रमुख आहेत.पण या बैठकीला पृथ्वीराज चव्हाण,डॉ.मुणगेकर,सुरेश शेट्टी आणि प्रतिभा शिंदे काँग्रेसच्या वतीने उपस्थित होते.सामाजिक संघटनांचे तुषार गांधी,उल्का महाजन,फिरोज मिठीबोरवाला आदी ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. काँग्रेसने जाहीरनामा तयार करण्यासाठी गंभीरपणे चर्चा सुरू केली आहे. भारत जोडो अभियान, महाराष्ट्र डेमॉक्रॅटिक फ्रंट,सलोखा समिती,नवी आव्हाने, नवे पर्याय, निर्भय बनो,हम भारत के लोग आदी संघटनेचे लोक यावेळी उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण दोन तास बसून कार्यकर्त्यांचे म्हणणे आणि प्रेझेंटेशन ऐकत होते.  
रविवार दिनांक १ सप्टेंबर रोजी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्त्यांची 'राज्यव्यापी विचार मंथन व निर्धार परिषद ' मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये आयोजित केली होती.वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या प्रश्नावर काम करणारे असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे आणि माजी आमदार जयदेव गायकवाड हे दोघे गेली दोन महिने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात फिरून अनेक कार्यकर्त्यांशी व्यक्तिगत संपर्क,चर्चा करून त्यांचे मुद्दे, म्हणणं समजावून घेत त्यांना प्रत्यक्ष निमंत्रण देवून या परिषदेला सन्मानपूर्वक बोलावले होते.कार्यकर्त्यांनीही त्याला उत्तम प्रतिसाद दिला होता.खासदार सुप्रिया सुळे आणि स्वतः शरद पवार या परिषदेत उपस्थित राहून कार्यकर्त्यांचे म्हणणं ऐकत होते.सुभाष वारे,नितीन वैद्य,सुभाष लोमटे,उल्का महाजन,प्रतिभा शिंदे,धनाजी गुरव, अविनाश पाटील,माधव बावगे आदी पुरोगामी चळवळीतील नेते व्यासपीठावर पवार यांच्यासोबत  बसलेले होते.
 मंगळवार ३ सप्टेंबर रोजी शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मातोश्रीवर सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती.या बैठकीत मुस्लिम समाजातील शाकीर शेख आणि काही कार्यकर्ते,फिरोज मिठीबोरवाला ,उल्का महाजन, सत्याजीत चव्हाण,सीताराम शेलार,अविनाश पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते. आघाडीचा वचननामा प्रसिद्ध करण्यापूर्वी महाराष्ट्रातील प्रमुख कार्यकर्त्यांचं म्हणणं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.सुभाष देसाई,अरविंद सावंत या बैठकीला उपस्थित होते.सुमारे तासभर उध्दव ठाकरे यांनी या कार्यकर्त्यांना वेळ दिला.लवकरच उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत सामाजिक कार्यकर्त्यांचे एक संमेलन करण्याचे या बैठकीत मान्य करण्यात आले आहे.
   खूपच सकारात्मक व उत्साह वाढवणारा प्रतिसाद तिन्ही प्रमुख पक्षा कडून मिळालेला आहे. महाराष्ट्रातील सभ्य, सुसंस्कृत वातावरण, संत आणि  महात्म्यांनी मांडलेला समतेचा विचार , स्त्रियांचा सन्मान, समृध्द परंपरा,आर्थिक समृद्धी,सर्वसमावेशक वृत्ती,सर्व स्तरावरील ही धूप रोखायला हवी.
कुठे नेवून ठेवला महाराष्ट्र माझा ? हा प्रश्न आताच्या राज्यकर्त्यांना विचारायला हवा.ही सारी चर्चा या तिन्ही पक्षाच्या नेत्यांसोबत चळवळीतील कार्यकर्ते करीत आहे.

Advertisement

Advertisement