सुजीत नाईक
लातूर दि. ०५ : लातूर जिल्ह्याचे राजकीय क्षेत्र चाकुरकर, निलंगेकर व देशमुख या तिन्ही नावाच्या अवती भोवती फिरताना पाहण्यास मिळते. विशेषत: या मतदारसंघात देशमुख आणि पाटील (निलंगेकर) यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. यापूर्वी स्व. डॉ. शिवाजीराव व स्व. विलासराव या दोघांमधील सुप्त संघर्ष जिल्ह्याने नेहमीच अनुभवला आहे. मात्र आता त्यांचाच राजकीय वारसा पुढे चालविणारे माजी मंत्री आ. अमित देशमुख व माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर या दोघांमध्ये खुुलेआम राजकीय संघर्ष सातत्याने पाहण्यास मिळत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आणि आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या संघर्षाला अधिक धार मिळालेली आहे. आगामी विधानसभेची निवडणूक जिल्ह्यात पाटील आणि देशमुख यांच्या वर्चस्वाची लढाई असल्यासारखी लढली जाणार आहे. परिणामी सहाही विधानसभा मतदारसंघात या दोघांच्या समर्थकांमध्ये धुसफूस होवू लागली आहे.
जिल्ह्याच्या राजकारणात लातूर आणि निलंगा हा विधानसभा मतदारसंघ नेहमीच केंद्रबिंदू राहिलेला आहे. लातूर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे स्व. विलासराव देशमुख आणि निलंगा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारे स्व. डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर या दोघांनीही राज्याच्या मुख्यमंत्रीपदासह मंत्रिमंडळात विविध खात्यांची जबाबदारी सांभाळली होती. हे दोन्ही नेते काँग्रेस पक्षात कार्यरत असले तरी त्यांच्यात नेहमीच सुप्त राजकीय संघर्ष सातत्याने जिल्हावासियांनी अनुभवला आहे. या दोघांनीही जिल्ह्यातील वर्चस्वासाठी धडपड होत असल्याचे बोलले जातआहे. त्यांचाच राजकीय वारसा चालविणारे लातूर शहर विधानसभेचे आ. अमित देशमुख आणि निलंगा विधानसभा मतदार संघाचे आ. संभाजी पाटील निलंगेकर हे दोघेही सध्या वेगवेगळ्या पक्षात म्हणजे काँग्रेस आणि भाजपा यामध्ये आपापले बस्तान योग्य प्रकारे बसविण्यात यशस्वी झाले आहेत. या दोघांनीही राज्याच्या मंत्रिमंडळात काम करीत जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली होती. हे दोन्ही नेते विरोधी पक्षात असल्यामुळे त्यांच्यात नेहमीच राजकीय संघर्ष होताना पाहण्यास मिळते. जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सांभाळल्यामुळे जिल्ह्यातील लातूर शहर, लातूर ग्रामीण, औसा, निलंगा, अहमदपूर व उदगीर या सहाही मतदारसंघात त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात आहेत.
काही महिन्यापूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या ताब्यात असलेला लातूर लोकसभा मतदारसंघ काँग्रेसने पुन्हा आपल्याकडे घेतलेला आहे. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपाचे नेतृत्व अमित देशमुख व संभाजी पाटील निलंगेकर यांनी केलेले होते. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयामुळे सध्या अमित देशमुख वरचढ असल्याचे बोलले जात आहे. मात्र लोकसभेतील पराभव निलंगेकरांच्या जिव्हारी लागला असल्यामुळे त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी किंवा रणनिती ठरवत प्रचाराला सुरूवातही केली आहे. या प्रचारात त्यांनी लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी मतदारांची दिशाभूल करत खोट्या अफवांचे पेव फिरवले असल्याचे सांगण्यास सुरुवात केली आहे. त्याच बरोबर निलंगा विधानसभा मतदारसंघात माझ्या पराभवासाठी बाभळगावच्या गढीवरील रसद पुरवली जात असल्याचे आरोप केले आहेत. मात्र, जिल्ह्याच्या राजकारणात निलंगेकरांचा दबदबा कायम राहिल असा दावा करीत यासाठी मतदारसंघातील जनता माझ्या पाठिशी खंबीर उभी असल्याचे विश्वासाने सांगत आहेत.
आ. निलंगेकरांच्या या आरोपांना आ. अमित देशमुखांनी फारसे महत्व नसल्याचे सांगून तुर्तास राजकीय वाद टाळला आहे. मात्र, देशमुखांकडून निलंगेकरांची कोंडी करण्याचे पुरेपुर प्रयत्न होताना दिसत आहे. त्याच पध्दतीने निलंगेकरही देशमुखांना अडचणीत आणण्यासाठी वेगवेगळ्या खेळी खेळत आपल्या राजकीय कौशल्याचा पुरेपुर वापर करीत आहेत. सहाही विधानसभा मतदारसंघात या दोघांकडून आपल्या समर्थकांना आत्तापासून ताकद देण्यास सुरूवात केली असून आगामी निवडणूकीत आपल्या समर्थकांच्या विजयासाठी साखर पेरणी करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीची लढाई ही पाटील देशमुखांच्या वर्चस्वाची लढाई ठरणार आहे.
प्रजापत्र | Friday, 06/09/2024
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा