मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला. या दुर्घटनेवरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. जो चुकीचे काम करतो, तोच माफी मागतो, असे म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले. स्व. पतंगराव कदम यांच्या पुर्णाकृती पुतळा अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते.
राहुल गांधी म्हणाले, "आज आपण कदमजींच्या पुतळ्याचे अनावरण केले. तिथे असताना मी विचार करत होतो की, कदमजींनी ६० वर्षे आपल्यासोबत काम केले. त्यांनी प्रामाणिकपणे काम केले. त्यांनी ६० वर्षात कधीही माफी मागितली नाही. का मागितली नाही, कारण गरज पडली नाही. हेच सत्य आहे. माफी तोच मागतो, जो चुकीचे काम करतो", असे म्हणत राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले.
मोदींनी माफी कोणत्या कारणासाठी मागितली? राहुल गांधींचा सवाल
पुढे बोलताना ते म्हणाले की, "काही दिवसांपूर्वी इथे शिवाजी महाराजांचा पुतळा बनवला. मी वृत्तपत्रात वाचले की, पंतप्रधान म्हणाले, मी शिवाजी महाराजांची माफी मागतो. मला हे समजून घ्यायचे आहे की, पंतप्रधानांनी कोणत्या कारणासाठी माफी मागितली?"
"अनेक कारणे असू शकतात. पहिले कारण असू शकते की, हा जो पुतळा होता, त्याचे कंत्राट आरएसएसच्या व्यक्तीला दिले होते. कदाचित पंतप्रधानांना म्हणायचे आहे की, मी हे कंत्राट आरएसएसच्या व्यक्तीला द्यायला नको होते. मी हे कंत्राट गुणवत्तेच्या आधारावर द्यायला पाहिजे होते", असे म्हणत राहुल गांधी मोदींना लक्ष्य केले.